लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सोनगाव तर्फ सातारा येथे एकाच्या शेतात बेकायदेशीर अतिक्रमण करून ताली-बांध तोडून दीड लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पांडुरंग केशव नावडकर, प्रकाश जाधव, शिवाजी महादेव धोंडवड (सर्व रा. सोनगाव तर्फ सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत हणमंतराव रामराव घाडगे (वय ६३, संभाजीनगर, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वरील संशयितांनी शेतजमिनीत विनापरवाना अतिक्रमण करून जमिनीच्या ताली व बांध तोडून टाकले तसेच बाभळीचे झाड काढून टाकले. तसेच फिर्यादीला तुम्ही बाहेरगावचे आहात, अख्खे गाव तुमच्यावर घालीन, अशी धमकीही दिली. या वेळी संशयित आरोपींनी चेहऱ्यावर कोणतेही मास्क परिधान न करता व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता कोविड-१९ च्या नियमांचेही उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी तिन्ही आरोपींवर दमदाटीने अतिक्रमण करून नुकसान केल्याप्रकरणी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार भोईटे हे करत आहेत.