नवनाथ जगदाळे।दहिवडी : शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा दरवर्षी गुढीपाडव्याला भरते. तर चैत्री एकादशीला मुख्य दिवस असतो. मात्र चालूवर्षी कोरोना विषाणूमुळे यात्राच रद्द झाल्याने विभूती बनविणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या यात्रेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, विदर्भसह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून किमान आठ ते दहा लाख भाविक दरवर्षी येत असतात, याचे औचित्य साधून शिंगणापुरात मोठ्या प्रमाणात विभूतीचे खडे बनवले जातात. शिंगणापुरात विलास शेंडे, रोहित राऊत, गणेश राऊत, विकास करचे यांच्यासह चार-पाचजण मोठ्या प्रमाणात विभूतीचे खडे बनवितात.
यावर्षीही मोठा व्यवसाय होईल, या उद्देशाने बारामतीतून कच्चा माल खरेदी करून तो कुटून भट्ट्या लावण्यात आल्या व सर्व विभूतीच्या वड्या बनवून हे विभूतीचे खडे तयार झाले होते. सर्वसाधारण दहा लाख विभूतीच्या वड्यांचे उत्पादन एकट्या शिंगणापुरात तयार झाले होते. ते विभूतीच्या वड्या हातावर पोट भरणारे लोक यात्राकाळात बेलफूल, विभूती विकत असतात.होलसेल वड्या दोन ते तीन रुपयांनी विकली जाते तर तीच किरकोळमध्ये पाच ते दहा रुपयाला भाविक घेत असतात. दहा दिवसांच्या यात्राकाळात विभूतीची लाखो रुपयांची उलाढाल होते.
यावर अनेक कुटुंबेही अवलंबून असतात. विभूतीला धार्मिक महत्त्व असल्याने घरातील देवघरात याचा सर्रास वापर केला जातो. परंतु यात्राच रद्द झाल्याने या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे, काही तरुणही या व्यवसायात उतरले; मात्र घातलेले भांडवलही निघणार नसल्याने विभूती उत्पादक चिंतेत आहेत.कर्ज काढून विभूतीचे उत्पादन..!आम्ही कर्ज काढून विभूतीचे उत्पादन घेतले. १५ दिवसांत पैसे माघारी मिळतील, अशी आशा होती; परंतु यात्राच रद्द झाल्याने विभूतीचा माल पडून राहणार असून, अशा व्यावसायिकांना शासनाने मदत केली पाहिजे.
शिखर शिंगणापूर यात्रा रद्द झाल्याने या लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या लोकांचा सर्व्हे करून शासनाने यांना तातडीने मदत केली पाहिजे. आम्ही शंभू महादेव प्रतिष्ठानच्या माध्यमातून ५० कुटुंबांना किराणाचे थोडेफार साहित्य दिले आहे. मात्र ही मदत तात्पुरती आहे.- वीरभद्र कावडे, सामाजिक कार्यकर्ते, शिखर शिंगणापूर