फलटण : केंद्र गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मूलन प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याकामी शासन निर्देशानुसार सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सी नेमणे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी १४ व्या वित्त आयोगातून नगरपालिकेची रक्कम देणे, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची दुरुस्ती करणे, भाजी मंडई वसुली ठेका पद्धतीने देणे आदी ४२ विषयांना नगरपालिका बैठकीत मंजुरी देण्यात आली. एका विषयाला विरोधकांनी विरोध केला. दरम्यान, शौचालयाच्या कामात व यादीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. फलटण नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगरपालिका सभागृहात नगराध्यक्षा नीता नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.केंद्र गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मूलन प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याकामी शासन निर्णयातील निर्देशानुसार सर्वेक्षण करण्याकामी एजन्सी नेमण्याचा विषय सर्वप्रथम घेण्यात आला. यामध्ये जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपड्यांचा आहे तेथेच पुर्नविकास करणे, कर्ज व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांनाही परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे. खासगी भागीदारीमध्ये परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकूल बांधण्यास अनुदान याचा समावेश आहे. यावर विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी शासनाच्या पूर्वीच्या घरकुलाच्या योजना का प्रभावीपणे राबविल्या गेल्या नाहीत. अनुदान का परत गेले याचा खुलासा मागितल्यावर उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी लाभार्थ्यांकडे योग्य जागा नसणे, पैसे नसणे तसेच सरकारकडून कमी अनुदान येणे असे प्रकार घडल्यामुळे योजना राबविताना अडचणी आल्या. मात्र, यापुढे प्रभावीपणे योजना सर्व संमतीने राबविण्याची ग्वाही दिली.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी १४ व्या वित्त आयोगातून नगरपरिषदेची रक्कम देण्याच्या ठरावावर विरोधकांनी बराच गोंधळ घालून शौचालयाच्या कामात व यादीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. अनेकांनी नुसते पैसे नेले. शौचालये बांधली नाहीत. ज्याला गरज आहे, त्याला प्राधान्याने पैसे द्या. बोगस लाभार्थींचे पैसे वसूल करा, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर सत्ताधारी गटाने बोगस लाभार्थी दाखवा कारवाई करतो, असे प्रत्युत्तर दिले. यावर बराच गोंधळ उडून हा विषय मंजूर करण्यात आला.फलटण शहरातील गजानन चौक येथे महात्मा गांधी यांचा पुतळा असून, या पुतळ्याची दुरवस्था झाल्याने या पुतळ्याची दुरुस्ती करण्यासाठी ४५ हजार रुपये खर्च करण्यास परवानगी देण्यात आली. मंजूर विकास योजना आरक्षण क्र. ३१ शासनस्तरावर रद्द करण्यात आले आहे. या आरक्षणाबाबत जागा संपादनाचा प्राप्त निधी फलटण कॉटन सेल जिनिंग अॅण्ड प्रोसिंग को. आॅपरेटिव्ह सोसायटी लि., फलटण यांची मिळकतीचे न. भ. क्र. ६४४४ या जागेतून ८० फुटी रिंगरोड रस्ता नगरपालिकेने विकसित केला आहे. या रस्त्याची नुकसान भरपाई या संस्थेने अदा करण्याच्या विषयावर विरोधकांनी अधिक माहिती मागितली. मात्र, ती त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना देता न आल्याने गोंधळ उडून हा विष्य पुढच्या मीटिंगला पुन्हा घेण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, सत्ताधारी गटाने ती मान्य न करता हा ठराव मंजूर केला. यावर विरोधकांनी विरोध करत ठरावाला विरोध असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)
अनुुदान लाटूनही स्वच्छतागृह कागदावरच
By admin | Published: February 28, 2017 11:41 PM