सातारा: अमरावतीहून निघून आलेल्या तरुणीला सातारा पोलीस आणि रेल्वेपोलिसांनी बुधवारी रात्री दहा वाजता सातारा रेल्वे स्थानकात ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळी अमरावतीचे पोलीस साताऱ्यात आल्यानंतर त्या तरुणीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.हिंदू तरुणीचे अपहरण करून तिचा आंतरधर्मीय विवाह करून मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या नातेवाइकांनी केला होता. यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या बेपत्ता मुलीचा शोध घेण्याची मागणी पोलिसांना केली होती. त्यावेळी पोलिसांसोबत त्यांची शाब्दिक खडाजंगीही झाली होती.अमरावतीचे पोलीस त्या तरुणीचा शोध घेत होते. बुधवारी रात्री पावणे दहा वाजता संबंधित तरुणी गोवा एक्सप्रेसने गोव्याकडे जात होती. त्यावेळी सातारा पोलिसांनी सातारा रेल्वे स्थानकात जाऊन तिला ताब्यात घेतले. त्या तरुणीसोबत कोणीही नव्हते. ती तरुणी एकटीच होती. एलसीबी कार्यालयात तिला आणण्यात आले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्वत: त्या तरुणीची चाैकशी केली. त्यावेळी तिने घरगुती वादातून मी निघून आले असल्याचे सांगितले.अमरावतीचे पोलीस गुरुवारी सकाळी सहा वाजता साताऱ्यात पोहोचले. त्यानंतर कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर सातारा पोलिसांकडून त्या तरुणीचा ताबा अमरावती पोलिसांकडे देण्यात आला. गुरुवारी दुपारी दीड वाजता त्या तरुणीला घेऊन अमरावतीचे पोलीस रवाना झाले.
लव्ह जिहाद प्रकरण: ‘त्या’ तरुणीला साताऱ्यात घेतलं ताब्यात, पोलीस बंदोबस्तात अमरावतीकडे रवाना
By दत्ता यादव | Published: September 08, 2022 3:06 PM