सातारा : पावसामुळे उरमोडी जलाशयातून शहापूर योजनेत मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे पाणी उपसा केंद्र ५० टक्के क्षमतेने सुरू असून, पालिकेने उपसा केंद्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या तीन दिवसांपासून कास व उरमोडी परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. मातीमुळे उरमोडी धरणाचे पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे उरमोडीतून शहापूर योजनेत गढूळ व गाळ मिश्रित पाणी येत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उपसा केंद्र ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवले असून, गाळ काढण्याचे कामही युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या कामामुळे शहापूूर योजनेतून पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट व पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी केले आहे.