सातारा : जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचे संकट संपले असून सध्या क्वचितच बाधित जनावरं आढळून येत आहेत. यामुळे प्रशासनासह बळीराजानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. असे असलेतरी आतापर्यंत २० हजारांहून अधिक जनावरांना लम्पीची बाधा झाली. तर १,४८० पशुधनाचा बळी गेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील २२९ गावांतच लम्पीचा शिरकाव झाला असलातरी सुमारे १,३०० गावांनी संकटाला दूर ठेवले आहे.जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचे संकट आले होते. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून शिरकाव झाला. त्यावेळी कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी गावात प्रथम लम्पीबाधित आणि मृत पहिल्या जनावराची नोंद झाली. त्यानंतर लम्पीचा प्रसार वाढत गेला. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतील जनावरांना या आजाराने गाठले. त्यावेळी पशुसंवर्धन विभागाने लम्पी संकटापासून जनावरांना वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली.
गोवंशीय जनावरांनाच हा रोग होत होता. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने गोवंशीय जनावरांचे लसीकरण पूर्ण केले. नोव्हेंबर महिन्यातच जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले होते. या लसीकरणानंतर मात्र, लम्पीने बाधित होणाऱ्या जनावरांचा आकडा कमी होत गेला. आतातर क्वचितच लम्पीबाधित जनावरे आढळून येत आहेत. यामुळे जिल्हा आता लम्पीमुक्त झाल्यातच जमा आहे.
२०, ४२२ बाधित...जिल्ह्यातील २२९ गावांत लम्पीबाधित जनावरे आढळून आली आहेत. मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील २० हजार ४२२ जनावरांना लम्पीने गाठले होते. तर त्यातील १ हजार ४८० जनावरे मृत झाली. सर्वाधिक बाधित आणि मृत जनावरांची संख्या फलटण तालुक्यात आढळून आली.
१९ हजार लम्पीमुक्त...जिल्ह्यात लम्पीतून मुक्त झालेल्या जनावरांचा आकडा १८ हजार ९०० च्यावर आहे. तर मागील आठवड्यापर्यंत फक्त १७ जनावरांवर उपचार सुरू होते. त्यामुळे जिल्ह्यात सध्या अत्यवस्थ एकही पशुधन नाही.
साडेतीन कोटींची मदत...या मृत पशुधनासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. दुधाळ जनावरांसाठी ३० हजार रुपये दिले. तर बैलांसाठी २५ हजार आणि लहान पशुधनासाठी १६ हजारांची मदत करण्यात आली. दि. ९ मार्चपर्यंत जिल्ह्यातील लम्पीने मृत १,४२० जनावरांसाठी शासनाकडून मदतीचे वाटप करण्यात आले. ३ कोटी ६८ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
फलटण तालुक्यात ५, ८४१ बाधित पशुधन...जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत लम्पीबाधित पशुधन आढळून आले. यामध्ये फलटण तालुका आघाडीवर राहिला आहे. फलटणमधील ५ हजार ८४१ जनावरे बाधित झाली. तर ४१६ पशुधनाचा बळी गेला आहे. यानंतर खटाव तालुक्यात ४ हजार ५०६ जनावरांना लम्पीने गाठले. यामधील ३३१ जनावरांचा मृत्यू झाला. माण तालुक्यात ३ हजार ९६९, काेरेगाव तालुका १ हजार ५७६, कऱ्हाड १ हजार ३६५, सातारा १ हजार ११६, पाटण तालुका ९४९, खंडाळा ६४४ अशाप्रकारे बाधित जनावरांचे प्रमाण राहिले आहे. तर माण तालुक्यात २९०, सातारा १२६, कोरेगावमध्ये १०४ जनावरांचा लम्पीने मृत्यू झालेला आहे. महाबळेश्वर तालुक्यात ३ जनावरांचा रोगाने बळी गेलेला आहे.