दहिवडी : माण तालुक्यावर यावर्षी पावसाची कृपादृष्टी चांगली झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा समाधानकारक आहे. परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. यंदा कोरोना आणि मिनी लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. तसेच माण तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी टिकून असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. त्यामुळे यंदा माण तालुका टँकरमुक्तीच्या मार्गावर आहे.
माण तालुक्यात उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली आहेत.
दहिवडी व गोंदवलेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा आंधळी धरणात आहे. आंधळी धरणावरील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला पाण्याची कमतरता जाणवणार नाही इतका मुबलक पाणीसाठा आहे. आंधळी धरण ५६, पिंगळी तलाव ६७ व राणंद मध्यम प्रकल्पात ६० टक्के पाणी साठा शिल्लक आहे. सरासरी सर्व प्रकल्पात ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर माण तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. परिणामी प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू लागत होते. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर टँकर मागणी प्रस्तावांना प्रवास करावा लागत असे. मात्र, यावर्षी टँकर मागणीचा एकही प्रस्ताव माण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे आलेला नाही. आगामी काळातही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचे चित्र यावर्षी तालुक्यात आहे.
माण तालुक्यात पाणी फौंडेशनच्या कामांचा मोठा फायदा
माण तालुक्यात सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा आणि पाणी फौंडेशनच्या माध्यमातून गावागावात श्रमदानाचे तुफान आले होते. दुष्काळी परिस्थितीच्या कालावधीत ग्रामस्थ अगदी अबालवृद्धांसह एकजुटीने कामाला लागले होते.गावागावात श्रमपंढरी फुलली अन मोठ्या प्रमाणात श्रमदानातून काम झाली.
चाैकट : विहिरींना चांगले पाणी...
अनेक गावांमध्ये शिवारातील विहिरींची पाणी पातळी अवघ्या पाच फुटावर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळेच यंदाच्या वर्षी शिवार हिरवा नेसून थटून गेला होता. राणंद, जाशी, ढाकण, लोधवडे प्रकल्पाचा शेती सिंचनासाठी फायदा राणंद तलावातून राणंद, जाशी, पळशी, गोंदवले खुर्द, ढाकणी तलावातून ढाकणी, गटेवाडी, दिडवाघवाडी तर लोधवडे तलावातून फक्त लोधवडे गावासाठी शेती सिंचनासाठी पाण्याचे एक आवर्तन करण्यात आले आहे. मात्र, आंधळी धरणाच्या परिसरातील विहिरींना चांगले पाणी असल्याने धरणातील पाण्याला शेतकऱ्यांकडून
आतापर्यंत मागणी आली नाही.