महाबळेश्वर : पर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात बोअरवेलने खोदाई करणे माचुतर येथील एका धनिकाला चांगलेच महागात पडले आहे. खोदाईसाठी वापरण्यात येणारे दोन मोठी मशिनरी असलेली वाहने महसूल विभागाने जप्त करून संबंधितांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या माचुतर येथील प्रदीप सतन शहा यांच्या ग्रामपंचायत मिळकतीमध्ये विनापरवाना बोअरने खोदाई करण्यात येत असल्याची माहिती तलाठी अविनाश शेडोळकर यांना समजली. त्यांनी ग्रामसेवक वनिता इंगळे यांना बरोबर घेऊन संबंधित मिळकतीमध्ये पाहणी केली असता, बोअरवेलसाठी उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्याठिकाणी असलेल्या संबंधितांकडे परवान्याबाबत चौकशी केली असता, त्यांनी बोअरवेलने खोदाई करण्याचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर तलाठी शेडोळकर यांनी सरपंच सुरेश शिंदे पाटील व विजय शिंदे यांना बोलावून घेतले व त्यांच्या समक्ष बोअर उत्खननाचा पंचनामा केला. त्यानंतर तलाठी शेडोळकर यांनी बोअर खोदाईसाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनरीसह दोन वाहने जप्त करून ती तहसीलदार कार्यालयात उभी केली आहेत.