खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाच्या कामकाजाचीही धावपळ सुरू असून, खंडाळा येथील किसन वीर सभागृहात बॅलेट मशीन सील करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दशरथ काळे यांच्या नियंत्रणाखाली १३८ मतदान केंद्रांच्या मशीन सील करण्यात आल्या.
खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींतील ४६१ जागांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला होता. यांपैकी सात ग्रामपंचायतींसह १३१ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ५० ग्रामपंचायतींच्या ३२० जागांसाठी निवडणूक होत आहे. या जागांसाठी एकूण ६९८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी १३८ केंद्रांवर मतदान होणार असून, या केंद्रासाठी प्रशासनाची काटेकोर तयारी सुरू झाली आहे. या केंद्रावर वापरात येणाऱ्या बॅलेट मशीन व कंट्रोल मशीन उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सीलबंद करण्याचे काम दिवसभर सुरू होते. या प्रक्रियेसाठी सात झोनल अधिकारी, २१ निवडणूक निर्णय अधिकारी व ४२ साहाय्यक अधिकारी कामकाज पाहत आहेत. त्याच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी या कामात व्यस्त आहेत.
फोटो : १०खंडाळा
खंडाळा येथील किसन वीर सभागृहात बॅलेट मशीन सील करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.