प्रशांत कोळी ।पावसाळ्यात मुख्य आकर्षण असणारा भांबवली धबधबा पाहण्यासाठी तसेच आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक भेट देत असतात. गर्द जंगलातून धबधब्याकडे जाण्यासाठी व परिसराची माहिती देण्यासाठी यंत्रणा, हंगामात किती पर्यटक येतात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजना याबाबत भांबवली येथील पर्यटन प्रमुख, सह्याद्री पठार विभाग विकास संघाचे रवींद्र मोरे यांच्याशी केलेली बातचित..
प्रश्न : वजराई धबधबा पाहण्यासाठी किती पर्यटक येतात?उत्तर : भांबवली-वजराई धबधबा पाहायला दरवर्षी अंदाजे एक लाख पर्यटक येतात. पर्यटक मुख्यत्वेकरून महाराष्ट्र, गुजरात व दक्षिणेकडील राज्यातील असतात. तुरळक पर्यटक हे उत्तर भारतीय असतात.
प्रश्न : यंदापासून शुल्क आकारत आहे, कारण काय?उत्तर : जिल्हा नियोजन समितीने भांबवली वजराई धबधब्याला ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा ५ जानेवारी २०१८ रोजी दिला. धबधबा विकसित करण्यासाठी वन पर्यटनाअंतर्गत आर्थिक तरतूद केली आहे. सुविधा शासनाच्या मदतीने दिल्या आहेत.
प्रश्न : पर्यटकांसाठी काही सुविधा दिल्या आहेत का?उत्तर : ठोसेघरच्या धरतीवर प्रेक्षागॅलरी बनविण्यात येणार आहे. ही प्रेक्षागॅलरी धबधब्या समोर उभारली जाणार असल्याने धबधब्याच्या रौद्ररुपाचे थ्रिलिंग अनुभवता येईल. पर्यटकांना बसण्यासाठी पॅगोडा, उरमोडी दर्शन व जंगल दर्शनासाठी दोन टॉवर, पाण्याचे एटीएम, जंगलातून चालण्यासाठी दगडी पायऱ्या, झाडांभोवती कट्टे, रॉक गार्डन, स्वागत कमान आदी सुविधा देणार आहेत.
प्रश्न : धबधबा आणि परिसराची माहिती देण्यासाठी यंत्रणा राबविली का?उत्तर : पर्यटन शुल्क वसुलीचे पहिलेच वर्ष आहे. ‘भांबवली हिल स्टेशन’ ही पर्यटन पुस्तिका धबधबा व इतर स्थळांची माहिती देणारी यंत्रणा राबविली जात आहे.जगातील सर्वात उंच धबधबाभांबवली वजराई धबधबा तीन टप्प्यांत कोसळतो. वरच्या टप्प्याची उंची २५२ मीटर एवढी आहे व तिन्ही टप्प्यांची उंची ५५६ मीटर आहे. म्हणजेच १८४० फूट. तिन्ही टप्प्यांची उंची मोजली तर देशातला नंबर एकचा धबधबा ठरतो. मुख्य म्हणजे हे तिन्ही टप्पे एकाच दगडात आहेत, त्यामुळे तिन्ही टप्प्यांची उंची एकत्र करणे योग्य आहे.
पर्यटकांसाठी आकर्षक स्थानेभांबवलीत निसर्गाने उधळण केली आहे. जगातील सर्वात मोठे भांबवली पुष्प पठार भांबवलीतच आहे. फक्त दसºयाच्या दिवशी या पठारावर विविधरंगी खेकडी बागडताना दिसतात. पांडवांच्या पायाचे ठसे या पठारावर पाहायला मिळतात. भांबवलीतील अखंड दगडात असलेले हनुमान मंदिर हे जागृतस्थान आहे. वजराई देवीचे मूळ स्थानक भांबवलीतच आहे. येथे नेहमीच गर्दी असते.