प्रमोद सुकरे--कऱ्हाड - तालुक्यातील एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणजे मदनदादा. आपल्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे ते साऱ्यांनाच परिचित आहेत; पण त्यांचं बोलणं साऱ्यांनाच बरं वाटतं, असं नाही. काहींना तर ते पचता पचत नाही. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. अशी अनेकांची अवस्था आहे. गुरुवारी झालेल्या कऱ्हाड दक्षिण काँग्रेसच्या मेळाव्यातही त्यांनी व्यासपीठावरच्या नेत्यांना कानपिचक्या देत आता जाहीर मेळावे, नेत्यांची भाषणे बंद करा. नुसते मार्गदर्शन करून उपयोग नाही. याउलट चिंतन मेळावे घ्या. कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी देऊन नेत्यांनी ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी, असे सुनावले. त्यामुळे कार्यकर्ते सुखावले अन् दादांच्या बोलण्यामागे नेमके काय-काय दडलेय याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या नाही तर नवलच. चिंतन मेळाव्याची मदनदादांची मागणी तशी जुनीच. म्हणजे चार महिन्यांपूर्वी विंग येथे झालेल्या एका काँगे्रसच्या मेळाव्यातही मदनदादांनी पृथ्वीबाबांच्या समोर चिंतन मेळाव्याची गरज व्यक्त केली होती; पण दादांचं बोलणं जिल्ह्यातील काँगे्रसच्या ज्येष्ठ नेत्यांनी गांभीर्यांने घेतलेलं दिसलं नाही. गुरुवारच्या मेळाव्यातही कार्याध्यक्ष अॅड. विजयराव कणसे यांनी आपण बोलण्यापेक्षा कार्यकर्त्यांची मते आजमावून घेऊया, असे सूचित केले; पण व्यासपीठावरील संयोजकांनी ‘ना-ना’ चा पाढा लावत नेत्यांच्या भाषणालाच प्राध्यान्य दिले. त्यातूनही अनेक वर्षे राजकारणात बरंच काही ‘भोगलेल्या’ एका वकिलांनी घुसखोरी करीत आपले मत मांडलेच. तालुका काँगे्रसचे पदाधिकारी निवडताना जुन्या निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करीत शहर काँगे्रस जिवंत आहे का? असा सवालही केला. त्यामुळे व्यासपीठावरील नेत्यांचे चेहरे चिंताग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले. काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला खरा; पण मेळाव्याला उपस्थित कार्यकर्त्यांचे त्याने समाधान झाले असे चेहऱ्यावर दिसले नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर मदनदादा मोहिते आणि पृथ्वीराज चव्हाण काय बोलणार, याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता होती. मदनदादा काहीच बोलले नसते तर नवलच. तरीही त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आजच्या मेळाव्याला पक्षनिरीक्षक असल्याने, मला बोलताना मर्यादा आहेत; पण तरीही आता मार्गदर्शन, भाषण बंद करायला हवे. अन् चिंतन मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय दडलंय हे जाणून घ्यायला हवे, असे म्हणत त्यांनी थेट विषयाला हात घातला.पृथ्वीराजबाबांकडे पाहत दादा म्हणाले, ‘मतदार संघातील अनेक वाडीमध्ये काही वर्षांपूर्वी आपल्याला प्रचारासाठी प्रवेशपण नसायचा. इंद्रजितच्या निवडणुकीवेळी आम्ही त्याचा अनुभव घेतलाय; पण आज काळ बदललाय. इथले ग्रामस्थ तुमचे स्वागत करायला उत्सुक आहेत, हे तुम्ही मुख्यमंत्री असताना अनुभवलंय; पण आता गावागावात, वाडी-वस्तीवर आपण पोहोचले पाहिजे. समाजाच्या नाडीवर आपण हात ठेवून काम केले पाहिजे. त्यासाठी गरज आहे चिंतन मेळाव्याची. तो कधी आणि कुठे घेताय, ते सांगा. मला आणि मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांना खूप काही बोलायचंय,’ असं दादांनी स्पष्टपणे सांगितले; पण संयोजकांपैकी एकानेही याबाबत उत्तर देणे टाळले.पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात देश-विदेशाच्या राजकारणावर बोलतानाच स्थानिक विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. मदनदादा म्हणतात, त्याप्रमाणे येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांची मते समजावून घेऊ, असे स्पष्ट केले. आता त्याला मुहूर्त कधी लागतोय याचीच साऱ्यांना प्रतिक्षा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघडपृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कऱ्हाडला चांगला निधी दिला. विकासकामाच्या माध्यमातून आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागू शकतो; पण जिंकू शकतो का? याबाबत माझ्या मनात साशंकता आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या कार्यपद्धतीत योग्य ते बदल करायला पाहिजेत. पायाभरणी भक्कम करायला पाहिजे. ‘तुझा माझा गट-तट न बघता सक्षम उमेदवार दिला पाहिजे,’ असे मदनराव मोहिते यांनी नेत्यांना सुनावले.बाजार समितीचं काय झालं?तालुक्याच्या राजकारणात महाआघाडी करून बाजार समितीत आपण ऐतिहासिक सत्तांतर केले. मी पुढाकार घेऊन त्याचा मेळ घातला. उमेदवार देतानाही माझ्या वाटणीला फक्त एक ओबीसी उमेदवार आला. त्यालाही पाडण्याचा आपल्याच लोकांनी प्रयत्न केला. सत्तांतर झाले. पण सत्ता कायम ठेवण्यात अपयश का आले, याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही, असा सवालही मदनराव मोहिते यांनी केला. टीका करण्यापेक्षा घालमेल समजून घ्या!जाहीर मेळाव्यात विरोधकांच्यावर आपण नेहमीच टीका करत राहतो. कुणी हातात कोणते चिन्ह घेतले, कोण कुठं गेलं, त्यांचं काय चाललंय यावर नुसती टीका करीत बसण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात काय घालमेल चाललीय हे पण बघायला पाहिजे. ती समजून घेतली, त्यावर उपाय शोधले तरच कऱ्हाड दक्षिणेत आपण टिकाव धरू शकतो, असे मतही मदनराव मोहिते यांनी व्यक्त केले.
मदनदादा म्हणे.. भाषण बंद; चिंतन करा !
By admin | Published: September 03, 2016 12:20 AM