खंडाळा : ‘मदनदादांना कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये घ्यायचे आहे, या मानसिकतेने आलो नाही. ते नेहमी जनतेच्या विचाराने चालले आहेत. जनतेला काय पाहिजे ते करत आहेत. मी काही म्हणणार नाही, याचा जनताच उचित निर्णय घेईल. विधानसभेत तुमच्या विचारांची गरज आहे. विधानसभेत एकत्र काम करू. त्यामुळे जनतेचा आवाज ऐकून मदनदादांनी भाजपमध्ये यावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी केले.
खंडाळा येथील किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योग खंडाळा-म्हावशी या साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन, श्रीगणेश मंदिराचे भूमिपूजन व भव्य शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाषराव देशमुख, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, किसनवीर साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले, व्हाईस चेअरमन गजानन बाबर, खंडाळा साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव गाढवे, व्हाईस चेअरमन व्ही. जी. पवार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘साखर उद्योग राज्याचा महत्त्वाचा उद्योग आहे. कारखान्यातून शेतकऱ्यांना स्थैर्य लाभते; पण उसाचे भाव आपण ठरवत असलो तरी साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ठरत असल्याने अडचणी येतात. साखरेची आधारभूत किंमत देण्याचा केंद्राने निर्णय घेतला असल्यानेच गतवर्षी ९९ टक्के एफआरपी राज्यात दिली. इथेनॉल प्रकल्प उभे राहिले तर अर्थकारण उभे राहील. शेतकºयांना अधिक दर देता येईल. पेट्रोल, डिझेलसाठी बाहेर जाणारा खर्च वाचेल. देशाचे परकीय चलन वाढेल. इथेनॉल प्रकल्पासह कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’
यावेळी चंद्र्रकांत पाटील, सुभाषराव देशमुख यांची भाषणे झाली. मदन भोसले यांनी प्रास्ताविक केले. गजानन बाबर यांनी आभार मानले. यावेळी राज्य सहकारी बँकेचे अविनाश महागावकर, अनिल जाधव, विक्रम पावसकर, नगराध्यक्षा लक्ष्मी कºहाडकर, रोहिणी शिंदे, दीपक पवार, आनंदराव शेळके यांच्यासह कार्यकारी संचालक, शेतकरी उपस्थित होते.... आता निर्णय घ्या : देशमुखमदन भोसले यांनी सरकारला शुभेच्छा दिल्यानंतर मंत्री सुभाष देशमुख यांनी जनसमुदायाला ‘दादा भाजपात यावेत, असे वाटते का? ते या मतदारसंघातून विधानसभेत जावेत,’ असे कोणाकोणाला वाटते? असे विचारले. यावेळी उपस्थित सर्वांनीच हात उंचावून सहमती दर्शवली. तर काहींनी उभे राहून घोषणा देऊन होकार कळवला. त्यानंतर ‘आता कार्यकर्त्यांची अन् लोकांचीही इच्छा आहे. मी अनेकदा आपल्याकडे आलो, आता जनतेची भावना ओळखून निर्णय घ्या,’ असे आवाहन मंत्री देशमुख यांनी केले.विधानसभेत मदनदादांची गरजमदन भोसले यांनी केवळ राजकारण केले नाही तर जनतेच्या समस्या सोडवल्या. त्यांचे प्रश्न तळमळीने मांडल्या. अशी तळमळीची माणसे विधानसभेत दिसली नाहीत की दु:ख होतं. तुमच्यासारखी माणसे विधानसभेत असली पाहिजेत की, जी जनतेचा विचार तेथे मांडतात. तुम्ही उर्वरित काळासाठी मला शुभेच्छा दिल्या; पण त्या पुढील काळासाठीही हव्या आहेत. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्या एकत्रित शुभेच्छा विधानसभेत जातील,’ असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.