सातारा : गौरी गणपतीच्या उत्सवात सजावटीचा भाग महत्वाचा असतो. यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात सजावटीच्या वस्तुंची रेलचेल असते. मागील काही वर्षापासून चायना सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी होती. मात्र यंदा स्वदेशी वस्तूलाच मागणी असल्याने दुकानदारांनी देखील चायना माल विक्रीस ठेवला नसल्याने यंदाची गौरी गणपतीची सजावट ही ‘मेड इन इंडिया’ च्या वस्तूने होणार असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.
येत्या दोन आठवड्यामध्ये गौरी गणपतीचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या बाजार पेठेत सजावटीची दुकाने सजू लागली आहेत. चायना वस्तू दिसायला आकर्षक व स्वस्त असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या वस्तूंना ग्राहकांची मागणी होते. त्यामुळे गणपती असो किंवा दिवाळी या वस्तूला मागणी वाढतच होती.
परंतु यंदा भारत आणि चिन मध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे नागरीकांनी स्वत:च चिनच्या वस्तू वापरण्यास बंद केल्या आहेत. याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवात जाणवणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे यंदाच्या गणेश उत्सवाला काही दुकानदारांनी चायना माल विक्रीस ठेवलेला नाही.