रहिमतपूर : जिजामाता साखर कारखान्यातील साडेतीन कोटी रुपयांच्या मशिनरी भंगार चोरीप्रकरणी फिर्यादी अॅड. वर्षा माडगुळकर यांचे पती शिरीष अच्युतराव कुलकर्णी तसेच भंगार व्यावसायिक नानाजी तुळशीराम कांबळे (रा. सातारा) या दोघांना रहिमतपूर पोलिसांनी अटक केली. या दोघांना कोरेगाव न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील जिजामाता साखर कारखान्यातील मशिनरी भंगार चोरीप्रकरणी अॅड. वर्षा माडगुळकर (वय ४३, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा ) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात रहिमतपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानुगडे यांनी फिर्याद दाखल झाल्यापासून दोन दिवसांत अभ्यास करून तपासाची दिशा ठरवली. काही घटनांचा त्यांनी शोध घेतला. दोन वर्षांपासून कारखाना बंद असताना या जुन्या मशिनरीचा विक्री करार जयदेव विरभान शर्मा (रा. जिंद, हरीयाणा) यांच्या श्री गणेश ट्रेडिंग कंपनीबरोबर दि. १ जून २०१६ रोजी करण्यात आला होता. या कराराप्रमाणे कारखान्याच्या मशिनरीपोटी पाच कोटी दहा लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार कारखान्याच्या करारापोटी शर्माने अॅड. वर्षा माडगुळकर यांना वीस लाख रुपये दिले होते. त्यानंतर मशिनरी कटिंगचे कामही सुरू झाले. तसेच संपूर्ण साईट जयदेव शर्माच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, काही दिवसांनी हा शर्मा पळून गेला. दि. ७ सप्टेंबर २०१६ रोजी त्या जिजामाता साखर कारखाना येथे गेल्या असता कारखान्यातील उघड्या शेडमधून मशिनरी व टर्बाइन चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यामध्ये तब्बल साडेतीन कोटी रुपयांची मशिनरी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली. जिजामाता साखर कारखान्या संर्दभात रहिमतपूर पोलिसांनी या परिसरात पहिल्यांदाच धाडसी कारवाई केल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. सहायक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानुगडे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)एक लाख तीस हजारांना विकले टर्बाइन !करार करून सुद्धा शर्मा कसा काय पळून गेला व मशिनरी चोरीस गेली कशी, या संशयावरून तपास कामी पोलिसांनी सर्वप्रथम व्यवस्थापनाशी संबंधित लोकांचीच चौकशी सुरू केली. तेव्हा सातारा येथे राष्ट्रीय महामार्गावर भंगार व्यवसाय करणाऱ्या नानाजी कांबळे यालाच घरातील एकाने केवळ एक लाख तीस हजारांना कारखान्यातील दोन टर्बाइन विकल्याची माहिती पुढे आली. तेव्हा वर्षा माडगुळकर यांचे पती शिरीष कुलकर्णी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कुलकर्णी व कांबळे यांनी गुन्हा कबूल केल्यावर सातारा येथून दोन टर्बाइनच्या मशिनरी रहिमतपूर पोलिसांच्या टीमने ताब्यात घेतल्या.
माडगुळकरांचा पतीच आरोपी!
By admin | Published: September 11, 2016 12:18 AM