सातारा : माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापत चालले असून, भाजपाचे उमेदवार व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी उद्धवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांची भेट घेतली. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगानेच चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे गोरे आघाडी धर्म पाळणार की दुसरा निर्णय घेणार ? हे लवकरच समोर येणार आहे. माढा मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातच प्रमुख लढत होणार आहे. भाजपाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून भाजपामधून आलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच धैर्यशील मोहिते यांनी आठ दिवसांपूर्वीच शेखर गोरे यांची भेट घेतली होती. यावेळी रघुनाथराजे नाईक-निंबाळकर हेही बरोबर होते. या भेटीत धैर्यशील यांनी गोरे यांना लोकसभा निवडणुकीत मदत करण्याबाबत आवाहन केले होते. यावर गोरे यांनी शब्द दिला नाही. त्यामुळे शेखर गोरे यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. या पार्श्वभूमीवरच खासदार रणजितसिंह यांनी शेखर गोरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून चर्चा झाली. पण, या भेटीतील तपशील समोर आलेला नाही. तरीही गोरे यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. कारण, मागील निवडणुकीत शेखर गोरे हे खासदार रणजितसिंह यांच्या पाठीशी उभे राहिले होते. यावेळी त्यांची भूमिका काय राहणार, याचा निर्णय झालेला नाही. तरीही ते उद्धवसेनेत आहेत. अशावेळी ते महाविकास आघाडीचा धर्म पाळणार का ? हे पाहणेही महत्त्वाचे ठरले आहे.
दहिवडीतील कार्यालयात माझी बैठक सुरू होती. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आले होते. दोघांच्या भेटीत माढा मतदारसंघाविषयी चर्चा झाली. पण, मी महाविकास आघाडीत आहे. तरीही महाविकास आघाडी माझे प्रश्न सोडवत नाही ताेपर्यंत मी प्रचारात सहभागी होणार नाही अशी सध्यातरी भूमिका घेतली आहे. - शेखर गोरे, जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना ठाकरे गट