सातारा : माढा मतदारसंघात राजकीय वातावरण हेलकावे खात असून नागपुरातील फडणवीस भेटीनंतर उत्तम जानकर यांनी बुधवारी सकाळीच धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याबरोबर पुण्यात शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पवार यांनीही दोघांना एकत्र या, असा संदेश दिला. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधकांत मनोमिलन झाल्याचे संकेत आहेत; पण, जानकर यांची भूमिका शेवटी काय राहणार याचा अंदाज बांधणे अवघड झालेले आहे.माढ्याच्या मागील निवडणुकीत उत्तम जानकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी काम केले. तसेच मोहिते-पाटीलही खासदारांबरोबर होते. राजकीय वितुष्टातून मोहिते-पाटील यांनी भाजपला सोडले. तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाऊन माढा लोकसभेची उमदेवारीही धैर्यशील मोहिते यांनी मिळवली.निवडणुकीसाठीच त्यांनी मतदारसंघातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीही वाढवल्या. त्यातूनच उत्तम जानकर यांच्याबरोबर एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू झाले. यासाठी लोकसभा मोहिते यांनी लढवायची तर विधानसभेला जानकर यांनी उतरायचे इथपर्यंत ही चर्चा गेली. त्यामुळे जानकर यांच्यासाठीही ही जमेची बाजू ठरली. जानकर यांच्याकडूनही एकत्र येण्याचे संकेत मिळाले. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून उत्तम जानकर हे भाजपच्याबरोबर राहतील असा अंदाज होता; पण, त्यांची नाराजी काही वेगळीच होती. त्यामुळे मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांची भेट झाली; पण, त्यावेळीही भाजपला पाठिंब्याविषयी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असे स्पष्ट केलेले. मात्र, सोलापूर मतदारसंघातून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जानकर आणखी नाराज झाले. त्यामुळे माढ्यात भाजपला दगाफटका बसण्याची शक्यता वाढली. ही नाराजी दूर करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच खासदार रणजितसिंह, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आणि जानकर हे विशेष विमानाने नागपूरला गेले; पण, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही त्यांची नाराजी दूर झाली नसल्याचे दिसत आहे.बुधवारी जानकर मोहिते-पाटील यांच्याबरोबर जाणार असे संकेत होते. त्यातूनच बुधवारी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत माढा मतदारसंघात मोहिते-पाटील यांच्याबरोबर एकत्र येण्याविषयी पवार यांनी आवाहन केले. तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघ निवडणूकविषयीही जानकर यांना आश्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जानकर हे मोहिते यांच्याबरोबर राहण्याचे संकेत आहेत. पण, दि. १९ एप्रिलच्या मेळाव्यातच जानकर कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेऊन भूमिका मांडणार आहे. त्यामुळे त्यानंतरच त्यांची खरी भूमिका समोर येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील हेही बरोबर होते. जवळपास एक तास चर्चा झाली. यातून पवार यांनी विराेधक एकत्र होतात, तसेच तुम्हीही बरोबर राहिले पाहिजे. मतदारसंघातील मते किती एकत्र होतात ते पाहा, काही नियम पाळले पाहिजते, असे सांगितले. तसेच आमच्या आणि मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांत विधानसभेबाबत प्राथमिक चर्चा झालेली आहे. आता १९ एप्रिलला कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असणार आहे.- उत्तम जानकर