सातारा : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातच चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीचा फैसला मंगळवारी होत असून, यामध्ये सातारकर पुन्हा की सोलापूरकर विजय मिळविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे, तर या निवडणुकीसाठी मतदारसंघातील १२ लाख मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण हे दोन विधानसभेचे मतदारसंघ येतात. मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिली निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिंकली होती, तर दुसऱ्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवलेला, तर २०१९ च्या तिसऱ्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विजय मिळवला. त्यामुळे या मतदारसंघात प्रथमच कमळ फुलले. आताची चाैथी निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण ३२ उमेदवार रिंगणात होते. तरीही खरी लढत भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात झाली. दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद निवडणुकीत लावली. त्यामुळे दोन्हीही बाजूंनी विजयाचे दावे केले जात आहेत. तरीही वंचित बहुजन आघाडी, बसपासह अन्य राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष किती मते मिळवतात, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. दरम्यान, माढा मतदारसंघ निवडणुकीची मंगळवार, दि. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.
‘वंचित’ गणित बिघडवणार का ?
मागील २०१९ च्या निवडणुकीत राज्यात वंचितच्या उमेदवारांनी अनेक मतदारसंघात लक्षणीय मते घेतली होती. त्यामुळे अनेकांचे विजयाचे गणित चुकले, तर माढा मतदारसंघातही ‘वंचित’चा उमेदवार होता; पण निवडणुकीत हा फॅक्टर तेवढा प्रभावी ठरला नव्हता. तरीही उमेदवाराने ५१ हजार मते घेतली होती. त्यामुळे यावेळी ‘वंचित’ किती मते घेणार यावरच ते कोणाचे गणित बिघडवणार का? याकडे लक्ष असणार आहे.
राजकीय पक्षाचे ९, अपक्ष २३ रिंगणात होते
माढा लोकसभा मतदारसंघात तब्बल ३२ उमेदवार होते. यामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे तीन, तर नोंदणीकृत राजकीय पक्षांचे ६ जण रिंगणात आहेत. म्हणजे विविध राजकीय पक्षांचे ९ उमेदवार माढ्यात नशीब अजमावत होते, तर अपक्ष २३ जणही मैदानात उतरलेले. या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील रहिवासी असणारे १०, तर सोलापूरमधील २२ उमेदवार होते.
माढा लोकसभा मतदारसंघ मतदान
एकूण मतदान - १९,९१,४५४मतदान झाले - ११,९२,१९०
टक्केवारी - ६०
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान आणि टक्केवारीकरमाळा - १,७४,८५६ : ५५
माढा - २,०६,३८३ : ६१.१३सांगोला - १,८७,२९८ : ५९.९४
माळशिरस - २,०३,३७० : ६०.२८फलटण - २,१५,८१५ : ६४.२३
माण - २,०४,४६८ : ५८.४२