सातारा : लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच माढ्यात महायुतीत बेसूर असून रासपनेही स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले आहे. यामुळे भाजपात वादळ उठणार आहे. तर या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडीतमहादेव जानकर यांना घेण्याच्या हालचाली वाढल्याची माहितीही मिळत आहे. त्यामुळे माढ्याचा तिढा भाजपसाठीतरी वाढणार असल्याचे संकेत सध्यस्थितीततरी दिसत आहेत.२००९ पासून माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. सोलापूर जिल्ह्यातील चार आणि साताऱ्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश या लोकसभेसाठी आहे. हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासूनच चर्चेत आहे. आतापर्यंतच्या तीन निवडणुकीत राजकीय संघर्षच पाहावयास मिळाला. कारण संपूर्ण मतदारसंघात राज्यातील दिग्गज नेते आहेत. प्रत्येकाचा सवतासुभा आहे. राजकीय पक्षापेक्षा त्यांची स्वत:ची व्होट बॅंक आहे. त्यामुळे हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला. आताही तशीच स्थिती निर्माण झालेली आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यापूर्वीच माढ्याचे राजकारण तापले आहे. मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी भाजप तयारीत आहे. यासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पूर्ण तयारी केली आहे. पण, त्यांच्या वाटेत महायुतीतून काटे पेरले जात आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांना आव्हान दिले आहे. दोघांतील वाद युतीत असूनही कमी झालेला नाही. त्यातच रामराजेंनी भाऊ संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासाठी तयारी केली आहे.त्याचबरोबर माळशिरस विधानसभा मतदारसंघातील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे सुपूत्र आमदार रणजितसिंह यांनी मागील निवडणुकीत खासदार रणजितसिंह यांच्यासाठी खूप मेहनत घेतली. पण, दोघांतही सख्य राहिलेले नाही. त्यातच विजयसिंह मोहिते यांचे पुतणे धैर्यशील मोहिते हे भाजपमध्ये आहेत. त्यांनाही खासदार व्हायचे आहे. यासाठी मतदारसंघात त्यांनी संपर्क वाढवलाय. भाजपने उमेदवारी दिलीतर ठीक नाहीतर त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी संपर्क वाढविल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजपची नाैका या वादळात किनारा गाठणार का ? अशी स्थिती आहे. असे असतानाच आता माजी मंत्री महादेव जानकर यांनी नवा डाव टाकला आहे.
रासपचे अध्यक्ष असलेले महादेव जानकर हे माण तालुक्यातील आहेत. त्यांना लोकसभेत जाण्याचे वेध लागले आहे. महायुतीत असूनही त्यांनी स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले आहे. त्यांची ही खेळी भाजपला अडचणीत टाकणारी आहे. रासपला या मतदारसंघात टाळणे किंवा दुर्लक्षित करणे भाजपला महागात पडू शकते. कारण, रासपची ताकद मतदारसंघात नक्कीच आहे. २००९ च्या निवडणुकीत पक्षाची ताकद कमी असतानाही जानकर यांनी शरद पवार यांच्याविरोधात लढून एक लाख मते मिळवली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांना दोन लाखांवर मते घेता आली होती. आज जानकर यांच्या नवीन खेळीचा भाजपला विचार करावाच लागणार आहे. त्याचबरोबर सध्या महाविकास आघाडीकडे तगडा उमेदवार नाही हेही सत्य आहे. आघाडीत मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे राहील. त्यांच्याकडून अभयसिंह जगताप यांनी जोरदार तयारी केली असलीतरी महाविकास आघाडीत जानकर यांना घेण्याच्या हालचालीही सुरू आहेत. शरद पवार यांच्याशीही त्यांची बातचित झाल्याची माहितीही मिळत आहे. त्यामुळे शरद पवार भाजपला रोखण्यासाठी स्वत:चा मतदारसंघ रासपला देऊन ताकदही लावतील. त्यामुळे भाजपच्या राज्यातील ४५ हून अधिक जागा जिंकण्याच्या दाव्याला खिळ बसू शकते. तरीही माढा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून बऱ्याच घडामोडी होणार होऊ शकतात हे निश्चित आहे.