कऱ्हाड : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत अपयश आलेल्या राज्यांतील निकालाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यनिहाय समिती स्थापन केल्या आहेत. मध्य प्रदेश राज्याची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आमदार चव्हाण यांच्यासह समितीमध्ये सप्तगिरी उल्का, आमदार जिग्नेश मेवानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह छत्तीसगड, ओडिसा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा आदी राज्यांत लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी समाधानकारक तथा खराब झाली आहे अशा राज्यात समिती स्थापन केली असून पक्षाच्या जेष्ठ नेत्यांना जबाबदारी दिली आहे.पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव तसेच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले असून, काँग्रेस पक्षाकडून सहा राज्यांत प्रभारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. यासह केंद्रात काँग्रेसचे आघाडी सरकार असताना मित्रपक्षांसोबत समन्वयक म्हणूनसुद्धा अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. याचमुळे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मध्य प्रदेश राज्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसकडून मध्य प्रदेशची जबाबदारी, लोकसभा निवडणूक निकालाचा घेणार आढावा
By दीपक शिंदे | Published: June 21, 2024 12:42 PM