सातारा : माढ्यात खासदार रणजितसिंह यांच्या उमेदवारीवरुन महायुतीतील उठावाला धार आली असतानाच आघाडीतही धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे युतीतील नाराज हे शरद पवार यांच्या गळाला लागण्यापूर्वीच अभयसिंह जगताप मेळाव्यात भूमिका जाहीर करणार आहेत. तर ठाकरे शिवसेनेनेही आयात उमेदवाराला विरोध केलाय. त्यामुळे माढ्यात उमेदवारीवरुनच दोन्हीकडेही उद्रेकच दिसत आहे.माढा मतदारसंघ सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पसरला आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर होऊन अनेक दिवस झालेतरी मतदारसंघाचे राजकीय चित्र स्पष्ट झालेले नाही. भाजपने प्रथम उमेदवारी जाहीर केली असलीतरी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीवरुन रान उठलेलेच आहे. तसेच त्यांच्या उमेदवारीच्या विरोधाला दिवसेंदिवस धार चढत आहे. त्यातच आता उमेदवारीवरुनच महाविकास आघाडीतही धूसफूस सुरू झालेली आहे. त्यामुळे माढ्याचे राजकीय गणित अजून पक्के झालेले नाही हेच स्पष्ट होत आहे.राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला. पक्षाचा एकही आमदार बरोबर नसताना (तीन आमदार अजित पवार गटाबरोबर गेले) शरद पवार गटाचे विचार पेरण्याचे काम केले. पण, आता महायुतीच्या भाजपमधील मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील रामराजे नाईक-निंबाळकर खासदारांच्या उमेदवारीमुळे विरोधात जाण्याच्या तयारीत आहेत.मोहिते तर शरद पवार यांच्या अधिक जवळ गेल्याचीही माहिती मिळू लागली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे नाराज जाऊन तुतारी वाजवू शकतात. याच विचारातून अभयसिंह जगताप यांनी मतदारसंघात मेळावा घेतल्याचे स्पष्ट होत आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा विचार घेऊन ते पुढील भूमिका ठरविणार आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास पवार यांना आणखी एक धक्का बसू शकतो. यातून पक्षाचेच नुकसान होणार आहे. याचा परिणाम निवडणुकीवरही होऊ शकतो. त्यामुळे जगताप काय भूमिका घेणार हे पाहणेही महत्वाचे आहे.
शिवसेना म्हणते निष्ठावंतांना साथ द्या..माढ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महायुतीतील नाराजाला उमेदवारी देण्याची शक्यता वाढली आहे. याला आता आघाडीतीलच शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला आहे. भाजपातील आयारामांना उमेदवारी दिली तर शरद पवार गटाचा प्रचार करणार नाही, असा इशाराच ठाकरे गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेने दिला आहे. त्यामुळे माढ्यात आघाडीतही वाद-विवाद सुरू असल्याचेच स्पष्ट झालेले आहे.
शरद पवार सामना करणार..रासपचे महादेव जानकर यांनी महायुतीबरोबर जाऊन शरद पवार यांना धक्का दिला. त्यातच आता आघाडीतीच उमेदवारीवरुन धूसफूस सुरू झाली आहे. याचा सामना पवार कसे करणार का नवीन राजकीय खेळी करणार ? यावर माढ्याची लढत अवलंबून असणार आहे.
ज्यांनी घरे फोडली, पक्षाचे वाटोळे केले. त्यांचा प्रचार आम्ही लोकसभा निवडणुकीत करणार नाही. कारण, ते महायुतीतून आघाडीत आलेतरी त्यांचा विचार जुनाच राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघात आयात उमेदवार देऊ नये. त्यांच्या पक्षातील निष्ठावंतांनाच उमेदवारी द्यावी. तरच आम्ही प्रचारात सहभागी होऊ.- शाहूदादा फरतडे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना ठाकरे गट पंढरपूर विभाग