महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन असलेले महाबळेश्वर थंडीने गारठले. येथील थंडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढू लागली आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार बुधवारी १३.६ व गुरुवारी येथील किमान तापमान १३.४ तर शुक्रवारी पहाटे १३.३ अंश सेल्सिअस होते. वेण्णा तलाव परिसरात ते आणखीन ४ ते ५ अंशांनी तापमानाने कमी होते.हुडहुडी भरणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी स्थनिकांसह येथे फिरायला आलेले पर्यटक उबदार कपडे परिधान करत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून येथे थंडी जाणवत असून तिची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. वाढत्या थंडीमुळे दोन दिवस हे गिरीशिखर दवबिंदूंनी अक्षरश: न्हाऊन निघाले होते. घरावरील पत्रे असो वा झाडे झुडपे सारे दवबिंदूंनी ओले चिंब झाले.
वेण्णा तलाव परिसरही त्यास अपवाद नव्हता. तापमान आणखीन खाली आल्याने वेण्णा तलावावरील पाण्यावर थंडीच्या वाफा भल्या पहाटेपासून पाहावयास मिळत होत्या. त्यामुळे वेण्णा तलाव परिसर गार तर होताच; परंतु तलावाच्या पाण्यावर थंड वातावरणामुळे वाफा जमा झाल्याने परिसर पांढरा झाल्याचे दिसत होते.
या थंडीतही काही हौसी पर्यटक फिरणारे मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत होते. मागील आठवड्यात ओखी वादळामुळे येथील हवा थंडतर होतीच; पण ते पावसाळीच बनले होते. त्यानंतर तापमानात थोडी वाढ झाली होती. आत्ता पुन्हा येथील थंडीचा जोर वाढू लागला आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार रविवारी येथील किमान तापमान १५.४, सोमवारी १४.६ , मंगळवारी १४.६, बुधवार येथील किमान तापमान १३.६ तर गुरुवारी ते १३.४ होते.