महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या बाजारपेठेत रात्री पालिकेकडून साफसफाई होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. संपूर्ण शहरात रात्री साफसफाई करून रात्रीच सर्व कचरा गोळा करण्यात यावा, अशी मागणी शहरातून होत आहे. या मागणीची दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे,’ अशी माहिती नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
दिवसेंदिवस महाबळेश्वर येथे भेट देणाºया पर्यटकांची संख्या वाढत आहे. सध्या येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानात सहभाग घेतला आहे. सर्वेक्षणात महाबळेश्वर पालिकेचा ३४ व्या क्रमांकावर पोहोचली असून, प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे हे स्वत: सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील व पालिकेच्या कर्मचाºयांच्या सहकाºयाने शहर स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.
नुकतेच स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत महाबळेश्वरची बाजारपेठ रात्री उशिरा स्वच्छ करण्याचा पालिकेकडून निर्णय घेण्यात आला. अनेकवेळा सफाई करूनदेखील बाजारपेठेत रात्री सर्वत्र अस्वच्छता दिसून येत होती. सकाळी पालिकेची कचरागाडी बाजारपेठेतून लवकर जात असल्याने अनेकवेळा व्यापारी रात्री दुकान बंद करतानाच कचरा बाहेर ठेवत होते. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षांनी रात्रीच बाजारपेठेतील कचरा साफ करण्याचा निर्णय घेतला.
रोज रात्री बारा वाजता येथील बाजारपेठेतून संपूर्ण रस्ता झाडून कचरागाडीत भरला जात असल्याने संपूर्ण बाजारपेठ रात्रीच स्वच्छ होते. सकाळी बाहेर पडणाºयांना व सकाळी बाहेरून दाखल होणाºया पर्यटकांना स्वच्छ शहर पाहण्यास मिळत होते. शहरातील बाजारपेठ रोज स्वच्छ दिसू लागल्याने अनेक नागरिकांनी केवळ बाजारपेठेऐवजी संपूर्ण शहरच रात्री साफ करण्याच्या प्रतिक्रिया शहरातून आल्या. त्यामुळे नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी रात्रीच शहर सफाई करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजनाचे काम हाती घेतले. शहरातून ओला व सुका कचरा वेगळा जमा करण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे शहरातील कचºयाचा निपटारा लवकर होत आहे.