महाबळेश्वर : दिवाळीच्या सुटीमुळे राज्याच्या विविध भागांतून पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. मात्र, शनिवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सोसाट्याचा वारा अन् थंडीमुळे महाबळेश्वरला हुडहुडी भरली आहे. महाबळेश्वरच्या १५.२ अंश सेल्सिअसच्या थंडीतही ऊबदार कपड्यांचा आधार घेत पर्यटनाचा आनंद घेत होते. सलग सुट्यांमुळे पर्यटनांचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने वाढत्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे पाचगणी व महाबळेश्वरला दाखल झाले आहेत. गुलाबी थंडीमुळे सुखावले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पर्यटकांची गर्दी झाली आहे. येथील नामांकित स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. वेण्णा लेक, बोटिंग, केट्स पॉइंन्ट, सनसेट पॉइंट, आॅर्थरसीट, विल्सन पॉइंट ही ठिकाणे पर्यटकांनी फुलली आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. चपला, जेली, जाम, मका, पॅटीस, क्रिम तसेच गरमा-गरम मका, पॅटीस खाण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. दरवर्षीप्रमाणे वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. शहरातील रस्ते तसेच वेण्णा लेक ते महाबळेश्वर या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा पर्यटकांबरोबरच स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीचे नियोजन कोलमडले असून, पर्यायी मार्गाचे नियोजन करण्याची मागणी होत आहे. नगरपालिका व पोलिसांनी वाहतुकीच्या समस्यांसंदर्भात नियोजन करण्याची गरज आहे.अचानक बदल झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे काही पर्यटक परतीच्या मार्गावर आहेत. तर हौसी पर्यटक या थंडीचाही आनंद घेत आहेत. त्यांना सिमला सहलीचा आनंद मिळत असल्याचे अनेक पर्यटकांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)पर्यटकांच्या स्वागताला पालिका सज्जदिवाळीची सुटी हा महाबळेश्वरमध्ये पर्यटनांचा हंगाम असतो. या काळात येणाऱ्या पर्यटकांसाठी वेण्णा लेकला मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यांना या ठिकाणी मनासारखा आनंद घेता यावा, यासाठी येथील बोट क्लबवर सिस्टीम कार्ड यंत्रणा बसविली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.व्यापाऱ्यांची ‘दिवाळी’दिवाळी सणाच्या निमित्ताने तसेच सलग सुट्यांमुळे राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरमध्ये दाखल होत आहेत. तसेच महाबळेश्वरमध्ये थंडीही वाढली आहे. त्यामुळे ‘सिमला’सारखे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या भागात पर्यटक येऊ लागले आहेत. रविवारीही पर्यटक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांचा व्यावसायही चांगलाच झाला आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी झाली आहे.
महाबळेश्वरला भरली थंडीनं हुडहुडी!
By admin | Published: October 25, 2014 11:53 PM