महाबळेश्वर : महाबळेश्वरला थंडीचा कडाका वाढत आहे. थंडीस जोरदार वाऱ्याची साथ मिळाल्याने, वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. सोमवारी शहरात ११ अंश तापमानाची नोंद झाली होती, तर वेण्णालेक परिसरात ७ अंश तापमान होते, तर लिंगमळा परिसरात केवळ ६ अंश तापमान असल्याची माहिती मिळत आहे.महाबळेश्वरला गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी भरली असून, चार पाच दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून, या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. प्रामुख्याने येथील प्रसिद्ध वेण्णालेक सह लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा कडाका अधिक जाणवत असून, महाबळेश्वरपासून काही किमी खाली गेल्यास काही भागांमध्ये बोचरी थंडी असते. मात्र, येथे गुलाबी थंडी असून, या गुलाबी थंडीचा पर्यटक अनुभव घेताना दिसत आहेत. मुख्य बाजारपेठेमध्ये फिरताना पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना दिसून येत आहेत, तर थंडीमुळे स्वेटर, शाल, ब्लँकेट्स खरेदी करण्याकडेही पर्यटकांचा कल असून, गरमागरम मका कणीस, पॅटिस, भजी, चहा यांसारख्या पदार्थांवर पर्यटक ताव मारताना पाहावयास मिळत आहेत.
महाबळेश्वरला वाढला थंडीचा कडाका, पर्यटक घेतायत गुलाबी थंडीचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:40 AM