जगदीश कोष्टी ल्ल सातारा शाळा-महाविद्यालयीन जीवनात सहलींना महत्त्वाचे स्थान आहे. जीवलग मित्रांसमवेत नवनवीन ठिकाणं पाहण्याची या निमित्ताने संधी मिळते. त्यासाठी देशभरातील शाळांची पहिली पसंती महाबळेश्वरला दिली जाते. गेल्या दोन महिन्यांमध्ये आतापर्यंत सुमारे पाव लाख विद्यार्थ्यांनी महाबळेश्वरला भेट दिली आहे. शाळा-महाविद्यालयीन वयातच विद्यार्थ्यांना विविध भाग, प्रांत तेथील लोकजीवन, राहणीमान यांचा जवळून अभ्यास करता यावा. तेथील वातावरण अनुभवता यावे, यासाठी सहली काढण्यास शिक्षणतज्ज्ञ सांगतात. थंड हवेचे ठिकाण म्हणून जगभर नावलौकिक मिळविलेल्या महाबळेश्वरमधील धबधबे, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील दऱ्या, जिल्ह्यातील किल्ले-गडकोट यांनी कायमच मोहिनी घातली आहे. या ठिकाणी एकदा सहल आल्यानंतर त्या शाळेची पुन्हा पुन्हा सहल काढण्याचा आग्रह धरला जातो. मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण या भागातून माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहली सर्वाधिक महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगडला येतात. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्यांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सहली येत असल्या तरी कर्नाटक, गुजरातमधील विद्यार्थ्यांचीही संख्या कमी नाही. कर्नाटक, गुजरात हे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आहेत. इंजिनिअरिंग, डॉक्टरेट किंवा आयटीच्या शिक्षणासाठी आपल्यातून परराज्यात गेलेले विद्यार्थी महाविद्यालय, विद्यापीठ प्रशासनाकडे आग्रह धरून महाबळेश्वर, पाचगणीला सहली आणण्यास भाग पाडत आहेत. परप्रांतातून आलेल्या सहलींमध्ये एक-दोन तरी मराठी मुलं भेटतातच. अनेक वेळा या सहलीच्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक भेटण्यासाठी जातात.स्थानिकांना रोजगाराची संधीमहाबळेश्वरचा मुख्य हंगाम हा उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यात असतो. त्या काळात लाखो पर्यटक भेट देतात. त्यानंतर अतिवृष्टीमुळे हंगाम थंडावतो. मात्र नोव्हेंबरपासून शालेय सहलींना सुरुवात होते. त्यामुळे अनेक उद्योगांना पुन्हा सुगीचे दिवस येतात. सातारी शाळांचा ओढा अजंठा-वेरुळकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातील शाळांच्या सहली महाबळेश्वर, पाचगणीला येत असल्या तरी सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक सहलींचा कल औरंगाबाद, अजंठा-वेरुळ, कोकणाकडे आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना सवलती...शालेय सहलींना महाबळेश्वरमध्ये अनेक ठिकाणी सवलती दिल्या जातात. महाबळेश्वरात येणाऱ्यांना दहा रुपयांचे शुल्क आकारले जाते. विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन रुपये घेतले जातात. परराज्यातून येणाऱ्या सहली मुक्कामासाठी हॉटेल किंवा मोठा हॉल अगोदरच बुकिंग करतात. त्यांनाही हजारो रुपयांच्या सवलती दिल्या जातात.
महाबळेश्वरला पंचवीस हजार विद्यार्थ्यांची भेट!
By admin | Published: January 24, 2017 11:34 PM