महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २ रोजी नगराध्यक्षांनी आयोजित केली आहे. विषयपत्रिकेमधील पहिल्याच वादग्रस्त विषयावरून अल्पमतातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे़ पहिला विषय वगळून पुन्हा सभा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली आहे. त्यामुळे सभेच्या भवितव्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वी पालिकेची सर्वसाधारण सभा ३१ मार्च रोजी ऑनलाइन आयोजित केली होती. सभेत ८४ विषय चर्चेसाठी ठेवले होते. परंतु नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या नगरसेवकांनी सभेला दांडी मारली. कोरमअभावी सभा रद्द करण्याऐवजी तहकूब केली. ती पुढे १ एप्रिल रोजी पुन्हा आयोजित केली. या सभेलाही विरोधकांनी गैरहजेरी लावली. १ एप्रिल रोजी होणारी सभा बेकायदेशीर असल्याने या सभेला मुख्याधिकारी पल्लवी पाटील याही गैरहजर राहिल्या होत्या. तहकूब सर्वसाधारण सभेस कोरमची आवश्यकता नसते. या नियमानुसार नगराध्यक्षांनी सभेतील सर्व विषय मंजूर केले. बहुमत नसताना नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभेतील सर्व विषय मंजूर केल्याने विरोधकांमध्ये खळबळ माजली.
दरम्यान, १ एप्रिलची सभा बेकायदेशीर असल्याची तक्रार विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. मुख्याधिकारी व तेरा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १ एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला स्थगिती दिली. सभेतील ठरावांच्या अंमजबजावणीसाठी रोख लावला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेतील कामकाजाच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली असतानाही नगराध्यक्षांनी २ जून रोजी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत वादग्रस्त सभेचे कामकाज कायम करण्याचा पहिला विषय घेतला आहे. ज्या सभेला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे, त्या सभेचे कामकाज कायम करणे हे नियमबाह्य होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग होणार आहे म्हणून विरोधी गटातील तेरा नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची सोमवारी भेट घेतली. नगरसेवकांसह तौफिक पटवेकर यांनीही या वेळी उपस्थित होते.
विरोधी गटातील काही नगरसेवक सत्ताधारी आघाडीचे सदस्य असल्याने त्यापैकी काही नगरसेवकांना याही वेळेस व्हिप बजावण्यात आला आहे. ३१ मार्चच्या सर्वसाधारण सभेसाठीही नगरसेवक कुमार शिंदे यांनी व्हिप बजावला होता. तो अनेक नगरसेवकांनी धुडकावला होता.