महाबळेश्वर : ‘कोरमअभावी पालिकेची सर्वसाधारण सभा रद्द् होते हा कायदा आहे. परंतु, नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांचे पती नगरसेवक कुमार शिंदे यांनी स्वतःच कायदा करून सर्वसाधारण सभा तहकूब केली. ही सभा नुकतीच पुणे आयुक्तांनी अवैध ठरवली. अस्तित्वात असलेल्या कायद्याचा मान ठेवून व नगरसेवकांना विश्वासात घेऊन कारभार केला असता तर नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे व त्यांचे कायदेपंडित पती नगरसेवक कुमार शिंदे यांच्यावर ही नामुष्कीची वेळ आली नसती’, असा टोला उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी लगावला.
नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांनी ३१ मार्च रोजी पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. उपनगराध्यक्ष अफजल सुतार व त्यांचे समर्थक नगरसेवकांनी या सभेला दांडी मारली. एकाचवेळी तेरा नगरसेवक गैरहजर राहिल्याने या सभेला कोरम भरला नाही. कोरमअभावी सभा रद्द करण्याची सूचना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली. परंतु, नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांची सूचना फेटाळून ती सभा तहकूब केली. तहकूब केलेली सभा नगराध्यक्षांनी पुन्हा १ एप्रिल रोजी आयोजित करून उपस्थित तीन नगरसेवकांच्या मदतीने विषय पत्रिकेतील ८४ विषय मंजूर केले. नगराध्यक्षांची ही कृती बेकायदशीर असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी सभेबाबत व सभेत मंजूर ठरावांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयमार्गे पुणे विभागीय आयुक्तांकडे आले. विभागीय आयुक्त अनिल राठोड यांनी नगराध्यांनी तहकूब केलेली सभा व त्या सभेत मंजूर केलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीला प्रतिबंध केला आहे.
यासंदर्भात गटातील नगरसेवकांची बाजू मांडण्यासाठी उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सुतार म्हणाले, ‘अनेक महिलांनी नगराध्यक्षपद भूषविले परंतु त्यांच्या पतींनी कारभारात कधीही ढवळाढवळ केली नाही. सध्याच्या नगराध्यक्षांनी मनमानी कारभाराचा उच्चांक मोडून नगराध्यक्षपदाची प्रतिमा मलिन केली आहे. पालिकेची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेतील काही विषय वगळण्याची मागणी केली होती. हे विषय वगळले असते तर नगराध्यक्षांचे आर्थिक नुकसान झाले असते म्हणून आमची मागणी नगराध्यक्षांनी मान्य केली नाही. त्यामुळे सभेवर बहिष्कार घालावा लागला, असे सांगून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांबरोबर संगनमत करून केलेला पालिकेतील अनियमित कारभार आता वेगेवगळ्या प्रकरणांमधून चव्हाट्यावर आला आहे. याची वेगवेगळया स्तरावर चौकशी सुरू आहे.