महाबळेश्वर : स्वच्छता अभियानात अव्वल आलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेचा कचरा डेपोवर टाकण्यात आलेल्या ओल्या कचरा हा जंगलातील प्राण्यांबरोबरच पाळीव गाईंसाठी जीवघेणा ठरत आहे. ओल्या कचऱ्याबरोबरच प्लास्टिकही गाई खात असल्याने त्यांना अनेक रोगांनी पछाडलेले आहे. यापैकी अनेक गाई मृत्युशी झुंज देत आहेत.महाबळेश्वर पालिकेचा कचरा डेपो हा शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिग लागले आहेत. महाबळेश्वर पालिका ओला आणि सुका कचरा वेगळा वेगळा गोळा करते? परंतु टाकताना तो एकाच जागेवर टाकला जातो आहे. ओल्या अथवा सुक्या अशा कोणत्याही प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही.
रोज कित्येक टन कचरा गोळा होतो व हा सर्व कचरा हा कारवी आळा कचरा डेपोवर गोळा केला जातो. या ठिकाणी टाकण्यात येणारा ओला कचरा हा जंगलातील प्राण्यांचा पशुपक्षांचा तसेच या परीसरातील पाळीव गाईंचे खाद्य बनले आहे. असा ओला कचरा हा नासुन जातो तर काही वेळेला अशा ठिकाणी किडे पडतात. सडलेला कचरा खावुन अनेक गाईंना आपले प्राण गमवावे लागले आहेत अशा घटना वरचेवर येथे घडत असतात.
आजही येथे मोठ्या प्रमाणावर मोकाट गाई या ठिकाणी कचरा खाण्यासाठी गोळा होतात. या ठिकाणी येणाऱ्या अनेक गाईंना अनेक व्याधींनी पछाडलेले आहे. अनेक गाई या मृत्युशी झुंज देत आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करणारे येथे युनिट पालिकेने बसविले आहेत. परंतु ये युनिट कित्येक महीन्यापासून बंद पडले आहेत.
बंद स्थितीत राहील्याने हे युनिट गंजले आहेत. आता पालिकेने नविन युनिट येथे आणून बसविले आहे. परंतु ते सुरू करण्यास पालिकेला मुहूर्त सापडला त्यामुळे पालिका नेमके काय काम करते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. घनकचरा व्यवस्थापनावर पालिकेचे करोडो रूपये खर्च होतात हा खर्च नेमका कशावर खर्च होतो हे समजू शकले नाही.