- सचिन लुंगसे लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘महाराष्ट्राचे काश्मीर’ असा नावलौकिक असणाऱ्या महाबळेश्वरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तेथील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून राज्य सरकारने निवडले आहे. देशातील हे पहिलेच ‘मधाचे गाव’ ठरणार आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये मधुचंद्रही आणि मधुपर्यटनही असा दुग्धशर्करा योग साधण्याची संधी नवथर जोडप्यांना मिळणार आहे. इतर पर्यटकांना स्ट्रॉबेरीबरोबरच एक मधाचे बोट चाखायला मिळेल.
मांघरमध्ये मधुपर्यटन सुरू व्हावे, यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गेल्या काही वर्षांपासून झटत आहे. या परिसराचा झालेला विकास पाहून विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांनी मधाचे गाव ही संकल्पना मांडली. आता ती प्रत्यक्षात साकारत आहे. याबाबतची घोषणा लवकरच उद्योगमंत्री सुभाष देसाई करणार आहेत. मधाचे गाव ही संकल्पना केवळ मांघरपर्यंत सीमित नसून ती राज्यातील इतर जिल्ह्यांत राबविली जाणार आहे.
असे आहे मांघर...मांघर हे गाव महाबळेश्वरपासून ८ किलाेमीटर कड्याखाली वसले आहे. गावची लाेकसंख्या ४५० आहे. ८० टक्के लोक मधमाश्यापालन करतात. या गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल असून, वर्षभर राहणारा फुलोरा आहे. गावाने आज अखेर शासनाचे जवळपास दहा पुरस्कार मिळवले आहेत. गावात मधमाश्यांमुळे समृद्धी आली आहे. गावात सामूहिक मधमाश्यांचे संगोपन केले जात आहे.
मध संचालनालयn मधमाश्यांचा विकास व विस्तार व्हावा, या उद्देशाने १९५७ साली मध संचालनालयाची स्थापना महाबळेश्वरला करण्यात आली आहे. n मधमाश्यांची संख्या वाढावी, तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, जंगल व डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधुपर्यटन ही संकल्पना रुजावी, यासाठी संचालनालय झटत आहे
मधाचे गाव संकल्पना केवळ मांघरपर्यत सिमीत नसून इतर जिल्ह्यात राबविली जाणार आहे. मधमाश्यांच्या परपरागीकरणामुळे शेतीपीक उत्पादनात वाढ होते, हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. - बिपिन जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग विभाग, मुंबई