महाबळेश्वर : महाबळेश्वरपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगड जिल्हा हद्दीमधील कालिका माता मंदिरा जवळ रात्रीच्या सुमारास दरड पडली असून पोलादपूर अंबेनळी घाट हा बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक ताम्हणी मार्गे वळविण्यात आली आहे. तर मेटतळे गावांच्या हद्दीमध्ये ही दगड माती रस्त्यावर आल्यामुळे महाबळेश्वर अंबेनळी घाट पोलिस प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे.रायगड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम युध्द पातळींवर सुरू असून पोलादपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सहित कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अंबेनळी घाटात ज्या ठिकाणी दरड पडलेली आहे तेथील रस्ता ही खचल्यामुळे या ठिकाणी पुन्हा दरड पडण्याची शक्यता वर्तवली असून महाबळेश्वर ते पोलादपूर हा अंबेनळी घाट काही काळ वाहतुकी साठी बंद ठेवण्यात आला होता.सदर ठिकाणी मधील दरड काढण्याचे काम युध्द पातळींवर सुरू होते. काही वेळानंतर दरड काढल्यानतर चार वाजल्या पासून हलकी वाहने सोडण्यात येत होती. तसेच महाबळेश्वर हून पोलादपूरला हलकी वाहने सोडण्यात येत होती. पोलिस कर्मचारी वर्गाकडून वाहने सावकाश चालवा घाटा मध्ये थांबू नका अशा सूचना करण्यात येत होत्या.२१ जुलै २०२१ मध्ये अबेनळी घाटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते वाहून गेले. तर दळवळणाची वाहतूक बंद पडली. ग्रामीण भागात भाजीपाल कडधान्य मिळणे मुश्किल होऊन गेले. याबाबत अशी पुन्हा घटना होऊ नये यासाठी महाबळेश्वर तालुक्यात कोठेही दरड पडली तर यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वर यांनी कंबर कसली असून ठिकठिकाणी जेसेबी तैनात करण्यात आले आहेत.
महाबळेश्वर-पोलादपूर घाटरस्ता वाहतूकीसाठी बंद, 'या' मार्गे वाहतूक वळविली
By दीपक शिंदे | Published: June 28, 2023 3:59 PM