अजित जाधव --महाबळेश्वर पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती; परंतु या निवडणुकीमध्ये महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेनेही चांगलीच तयारी केल्याचे दिसून येत आहे. यामुळे महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समितीच्या निवडणुका अटीतटीची होणार आहे.महाबळेश्वर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे दोन गट आहेत. मागील २०१२ मधील निवडणुकीमध्ये भिलार या गटात सर्व साधारण असे आरक्षण पडले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब भिलारे या गटातून निवडून आले होते; परंतु यावेळी झेडपी भिलार गटासाठी इतर मा. महिला आरक्षण पडल्यामुळे बाळासाहेब भिलारे यांची चांगलीच गोची झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात झेडपीच्या तळदेव गटातून २०१२ मध्ये अनुसूचित जाती असे आरक्षण पडले होते. यावेळी सुरेश सपकाळ तळदेव या गटातून निवडून आले होते; परंतु या निवडणुकीत झेडपी गट तळदेव या गटामध्ये इतर मा. महिला असे आरक्षण पडल्यामुळे सपकाळ हद्दपार होणार असे दिसून येते आहे. या झेडपी गट तळदेवमधून पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. संजय जंगम यांचे पत्नी सरोज जंगम असे इच्छुक उमेदवाराच्या नावांची चांगलीच चर्चा सुरू आहे.महाबळेश्वर पंचायत समितीचे एकूण चार गण आहेत. यामध्ये भिलार या गणासाठी २०१२ मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण होते. यावेळी राजेंद्र राजपुरे निवडून आले होते; पण यावेळी भिलार या गणामध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्यामुळे या गणात ‘महिलाराज’ होणार असे दिसून येते तरीही भिलार गणामधून राजेंद्र राजपुरे यांच्या पत्नी रूपाली राजपुरे यांच्या नावाची चर्चा पाचगणी व भिलार या गावात सुरू आहे. मेटगुताड या गणामधून २०१२ या निवडणुकीत सर्वसाधारण असे आरक्षण होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सजंय गायकवाड निवडून आले होते. पण यावेळी या मेटगुताड या गणामध्ये ना. मा. प्रवर्ग असे आरक्षण पडल्यामुळे संजय गायकवाड वाडा कुंभरोशी या गणामधून प्रयत्न करणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या मेटगुताड या गणामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून क्षेत्र महाबळेश्वर येथील जीवन महाबळेश्वरकर, जयवंत शिर्के, मुन्ना वारुणकर, रमेश चोरमुले, प्रदीप कात्रट, शानवाज डांगे, अबकर शारवान यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.तळदेव या गणामध्ये मागील २०१२ या निवडणुकीत तळदेव या गणामध्ये ना. मा. प्रवर्ग असे आरक्षण होते व त्यावेळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री जंगम या निवडून आल्या होत्या; परंतु या निवडणुकीमध्ये तळदेव या गणामध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळे या भागात महिलाराज असे चित्र दिसून येत आहे. वाडा कुंभराशी या गणामध्ये मागील २०१२ या निवडणुकीत सर्वसाधारण महिला असे आरक्षण होते. त्यावेळी पंचायत समितीच्या सभापती मंगला विठ्ठल जाधव या निवडून आल्या व या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचा वारू शिवसेना रोखणार ?पंचायत समितीमध्ये गेली अनेक वर्षांपासून बाळासाहेब भिलारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. शिवसेनेचे डी. एम. बावळेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धोंडिराम बापू जाधव यांना शिवसेनेने आणल्याने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची ताकद तूल्यबळ मानली जात आहे. त्यामुळे पंचायत समितीमध्ये पुन्हा सत्तास्थापन करण्यात राष्ट्रवादीला यश येणार का? राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यास शिवसेनेला यश येणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
महाबळेश्वरात मातब्बरांना धक्का; महिलाराज येणार !
By admin | Published: October 07, 2016 10:03 PM