महाबळेश्वर : महाबळेश्वर अर्बन बॅंकेने आर्थिक वर्षात १०४ कोटींचा व्यवसाय केला आहे, अशी माहिती अर्बन बँकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे यांनी दिली.
बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार वायदंडे व संचालक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सभा ऑनलाईन घेण्यात आली.
सचिन धोत्रे म्हणाले, बँकेने ३७ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. बँकेच्या ठेवी ६६ कोटी ८६ लाखांवर पोहोचल्या आहेत. राखीव निधीसह इतर सर्वच निधींमध्ये वाढ झाली आहे. भविष्यात सभासदांना अत्याधुनिक डिजिटल सेवा पुरविणार आहे.
माजी अध्यक्ष राजेश कुंभारदरे यांचे यावेळी भाषण झाले. सभेस संचालक बाळासाहेब कोंढाळकर, सी. डी. बावळेकर, युसूफ शेख, वृषाली डोईफोडे, संगीता तोडकर, जावेद वलगे, दिलीप रिंगे, इरफान शेख, बाबूराव कात्रट, गजानन फळणे, संजय जंगम, महाव्यवस्थापक बाळकृष्ण साळुंखे उपस्थित होते. (वा. प्र.)
फोटो ३०महाबळेश्वर अर्बन बँकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला.