महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पारा शुक्रवारी १५ अंशांवर स्थिरावला. हवामान विभागाने महाबळेश्वरचे कमाल तापमान २७.६ तर किमान तापमान १५.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता ओसरली असली तरी सायंकाळनंतर हवेत गारवा पसरत आहे. शनिवार व रविवारी या पर्यटनस्थळाला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असून, येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
कांद्याचे दर उतरले; ग्राहकांना दिलासा
सातारा : साताऱ्यातील मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढली असून, दर उतरल्याने याचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत कांद्याची विक्री प्रतिकिलो ७० ते ८० रुपये या दराने केली जात होती. हा कांदा आता ३० रुपयांवर आल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत नव्या कांद्यांची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे दरही उतरू लागले आहेत. तब्बल दीड ते दोन महिन्यांनंतर दरात घसरण झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मार्निंग वॉकला
नागरिकांची गर्दी
सातारा : आरोग्याच्या बााबतीत सजग असलेले सातारकर आताा मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले आहे. शहरातील शाहू स्टेडियम, अजिंक्यतारा किल्ला, मंगळाई देवी मंदिर, चार भिंती, कुरणेश्वर, यवतेश्वर, कास मार्ग, महादरे या ठिकाणी नागरिक मॉर्निंग वॉकला येत आहेत. शहरातील व्यायामशाळा देखील तरुणांनी गजबजून जात आहेत. याठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करण्याबरोबरच व्यायमशाळा चालकांकडून निर्जंतुकीकरणाबाबत अधिक काळजी घेतली जात आहे.