पाचगणी : स्ट्रॉबेरी लँड म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी फळाला बहर येऊ लागला आहे. स्ट्रॉबेरी विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाली आहे. सध्या स्ट्रॉबेरी प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये या दराने विकली जात आहे; परंतु यंदा उशिरा लागवड व कमी उत्पादन यामुळे हा दर हजारी ओलांडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कोरोनाचे सावट असताना सुद्धा दिवाळीतील अनलॉकनंतर पर्यटक पर्यटनस्थळी दाखल होत आहेत. त्याचवेळी महाबळेश्वरचे अस्सल लालबुंद फळ स्ट्रॉबेरीचे सुद्धा पर्यटकांच्या दिमतीस बाजारपेठेत आगमन होऊ लागले असल्याने प्रतिकिलो दर सातशे आठशेच्या घरात असून, यावर्षी हजारी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि अस्मानी संकटामुळे महाबळेश्वर तालुक्याच्या ४० ते ४५ टक्के क्षेत्रावरच स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. यावर्षी स्ट्रॉबेरीचे ६० टक्के क्षेत्र घटले आहे. त्यातच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना लागवड उशिरा करावी लागली तर काही शेतकऱ्यांनी भरपावसात स्ट्रॉबेरी लागवड केली. त्यातील पहिल्या लागवडीच्या स्ट्रॉबेरीला फळे लागण्यास सुरुवात झाली आहे. ही फळे बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली असून, याचे दर प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल केला. दिवाळी सणापूवी पर्यटनस्थळांवरील निर्बंधही उठविण्यात आले. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना ऐन दिवाळीत स्ट्रॉबेरीची गोडी चाखावयास मिळाली. दर अधिक असले तरी पर्यटकांमधून स्ट्रॉबेरीला मागणी वाढू लागली आहे. स्ट्रॉबेरी बरोबरच राजबेरीसुद्धा बाजारपेठेत उपलब्ध झाली आहे. याचे दर ही किलोला ७०० ते ८०० रुपये इतके आहेत.
कोरोनाचे व अस्मानी संकटावर मात करीत आम्ही स्ट्रॉबेरीची थोडीफार लागवड केली आहे. आता कुठे स्ट्रॉबेरीला फळे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चांगला दर मिळत आहे. फक्त कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्यात खंड पडू नये हीच अपेक्षा.- प्रवीण मानकुमारे, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी पाचगणी