सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते यांची पदोन्नतीवर साताऱ्याचे उपवनसंरक्षक म्हणून नेमणूक झाली आहे, तर डॉ. भारतसिंह हाडा यांची उपवनसंरक्षक नागपूर येथे झाली आहे.
याबाबतचे आदेश बुधवारीच मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी काढले आहेत. भारतीय वनसेवेतील २७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. त्यामध्ये या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मोहिते यांनी कृषी विद्यापीठातून एम. एस्सी. ॲग्रीची पदवी घेतली. २०१२ ते १६ या कालावधीत सहायक वनसंरक्षक म्हणून साताऱ्यात काम केले. नंतर दोन वर्षे त्यांनी पुण्यात काम पाहिले. २०१८ पासून त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात, चांदोली राष्ट्रीय उद्यानात विभागीय वनाधिकारी म्हणून आजअखेर काम पाहिले. तेथे गेल्या तीन वर्षांत पुनर्वसन व संरक्षण कार्यात महादेव मोहिते यांनी खूप मोठा हातभार लावला असून, व्याघ्र प्रकल्पाचा व्यवस्थापन व पर्यटन आराखडा तसेच सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान स्थापन्यामध्येही मोलाचे योगदान दिले आहे. चांदोली - हेळवाक परिसरात पर्यटन वाढावे यासाठी त्यांनी दुर्गम भागात रस्ते निर्माण करणे, वन्यजिवांची वाढ होण्यासाठी कुरण विकास, आदी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत.
साताऱ्यातील कामाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. जिल्ह्यात त्यांचे बातमीदारांचे मोठे नेटवर्क आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रवाढ, वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटन विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा लाभ होईल, अशा प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींतून उमटल्या आहेत.
डाॅ. भारतसिंह हाडा यांची नागपूरला बदली झाली असून, त्यांच्या पत्नी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डाॅ. विनिता व्यास यांचीही नागपूरला कार्य आयोजना येथे बदली झाली आहे. सामाजिक वनीकरणचे धर्मवीर सालविठ्ठल यांची उपवनसंरक्षक वडसा (प्रादेशिक) येथे बदली करण्यात आली आहे.
महादेव मोहिते यांचा फोटो आहे
__________________