सातारा : वाहिनीवर आकडा टाकून अनाधिकृतपणे वीज वापरुन नंतर बीलही न भरणाऱ्याच्या विरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी महावितरणच्या वतीने धुळदेव, ता. माण येथील एकाच्या विरोधात तक्रार देण्यात आलेली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता रोहित तायडे यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनंतर तानाजी बाबा कोळेकर (रा. धुळदेव) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. घरगुती वीज कनेक्शन नसतानाही स्वत:च्या आऱ्थिक फायद्यासाठी वीज वाहिनीवर आकडा टाकण्यात आला होता. या आकड्याद्वारे अनाधिकृतपणे घरगुती वापरासाठी वीज जोडणी करण्यात आलेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर महावितरण कंपनीचे सुमारे सहा महिन्यांचे बील २ हजार ५७० रुपये आणि तडजोड रक्कम २ हजार असे एकूण ४ हजार ५७० रुपये बील देण्यात येऊनही भरण्यात आले नाही. त्यामुळे म्हसवड शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
Satara: आकडा टाकून वीज वापरणाऱ्यांवर महावितरणची कारवाई, एका विरोधात गुन्हा नोंद
By नितीन काळेल | Published: June 12, 2023 6:19 PM