महाबळेश्वर : वेण्णा धरणातून होत असलेली गळती शोधण्यासाठी कलर डाय टेस्ट या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. गळतीचा धरणाला कोणताही धोका नाही. मात्र, लघु पाटबंधारे व जीवन प्राधिकरण विभागाने गाफील न राहता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केली.
वेण्णा धरणाच्या सांडव्याला लागून असलेल्या संरक्षक भिंतीला गळती लागल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. आमदार मकरंद पाटील यांनी अधिकाºयांसमवेत या धरणाची पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी ते म्हणाले, गळती कोठून होत आहे? हे निश्चित सांगता येत नाही. मात्र, गळतीची जागा शोधण्यासाठी कलर डाय टेस्ट या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च सेंटर या संस्थेमार्फत हे काम केले जाईल.
या पद्धतीमध्ये पाणबुड्या पाण्यात सोडण्यात येतात. या पाणबुड्या निरीक्षण करून गळतीची जागा शोधून काढतात. यानंतर योग्य ती उपाययोजना करून गळती थांबविली जाते. काही दिवसांत धरणाची गळती पूर्णपणे बंद केली जाईल.
या वेळी लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, जीवन प्राधिकारणचे मुख्य अभियंता एस. एन. गरांडे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गाडे, उपअभियंता व्ही. एल. कुलकर्णी, बाळासाहेब भिलारे, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, उपसभापती संजय गायकवाड, युसूफ शेख, कुमार शिंदे, दत्तात्रय वाडकर आदी उपस्थित होते.वाया जाणारे पाणी जॅकवेलमध्ये सोडणारगळतीच्या ठिकाणाची दररोज पाहणी करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा विसर्ग वाढतो का? रंग बदलतो का? पाण्याबरोबर वाहून येणारे साहित्य या सर्व बाबींचे निरीक्षण केले जाणार आहे. वाहून जाणारे पाणी वाया न घालवता ते जलवाहिनीमार्फत पुन्हा जॅकवेलमध्ये सोडण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी दिली.