दिलीप पाडळे पाचगणी : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिपंढरपूर करहर ता.जावळी येथे विठुरायाची महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. सातारा जावळीचे भाजपाचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते तसेच जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे व माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा संपन्न झाली.महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी! या उत्सवानिमित्त दरवर्षी प्रतीपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या करहर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आजची महापूजा भक्तीभावाने संपन्न झाली. सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी महापूजा पार पडली. यावेळी गावातील तीन वारकरी दाम्पंत्यांनाही विठुरायाच्या पुजेचा मान देण्यात आला. यावेळी तहदिलदार हणमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर, जावळी - महाबळेश्वर बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, मेढा पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, करहरच्या सरपंच सोनाली यादव, उपसरपंच प्रदीप झंडेंसह ग्रामस्थ उपस्थित होते.धार्मिक पूजेनंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची रांग लागली. दुपार नंतर काटवली, बेलोशी, दापवडी या दिशेने पालख्या येत असतात. त्याच वेळी कुडाळ, सोमर्डी, बामणोली, शेते, करंदी, येथून सुद्धा पालख्या आणि पारंपरिक वेशभूषा केलेल्या दिंड्या येतात. बस स्थानकावर हे वारकरी दिंड्या एकत्र आल्याने विठ्ठल नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळ्यास भाविकांनी गर्दी केली.
प्रतिपंढरपूर करहरमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 6:40 PM