सातारा : साताऱ्यातील संगममाहुली येथे असणाऱ्या महाराणी येसूबाई यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या हालचाली गतिमान झाल्या असताना आता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा विषयही चर्चेत आला आहे. पुरातत्व विभागाने या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींमधून होत आहे.करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा तर राजाराम महाराजांच्या पत्नी त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पराक्रम केले. एक स्त्री असूनही त्या काळात त्यांनी औरंगजेब आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर त्यांचे काही काळ वास्तव्य होते. किल्ल्यावर १७६१ रोजी देहावसान झाल्यानंतर त्यांची संगममाहुली येथे कृष्णा नदी काठावर समाधी बांधण्यात आली. साताऱ्यातील जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेने दिवंगत शिवाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली २००५ रोजी या समाधीचा शोध घेतला होता.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यात काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा इतिहास अभ्यासकांनी शोध लावला. सुस्थितीत असलेल्या या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी साताऱ्याच्या लोकप्रतिनिधींनीही एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, संगममाहुलीत कित्येक वर्षांपासून जीर्णाेद्धाराच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराणी ताराराणींच्या समाधीकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले ना पुरातत्व विभागाचे. इतिहासाच्या या पाऊलखुणांचे संवर्धन करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
ही तर सातारकरांची जबाबदारी..साताऱ्यातील संगममाहुली हे एक धार्मिक क्षेत्र असून, येथील पुरातन मंदिरे आजही इतिहासाची साक्ष देतात. मात्र, आजमितीला हे सांस्कृतिक वैभव निस्तेज होऊ लागलेय, ते केवळ आपल्या अनास्थेपायी. या घाटावर राजघराण्यातील अनेक सदस्यांच्या समाधी असून, इतिहास अभ्यासकांमुळे त्या हळूहळू प्रकाशझोतात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाची जपणूक करणे, ही सातारकरांचीच जबाबदारी आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच संगममाहुलीतील महाराणी येसूबाई यांच्या समाधीची पाहणी केली. यावेळी घाटावर असलेल्या राजघराण्यातील अन्य सदस्यांच्या समाधीची त्यांनी माहिती दिली. या समाधीस्थळांच्या संवर्धनासाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील. - सुहास राजेशिर्के, संस्थापक, महाराणी येसूबाई फाउंडेशन