सातारा : महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा सर्वार्थाने विकास साधला जाईल. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याबरोबरच पुरातत्व विभाग व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेतली जाईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.साताऱ्यातील संगममाहुली येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधीला खासदार उदयनराजे यांनी आज, सोमवारी सकाळी अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या युगपुरुषांचे योगदान अमूल्य आहे. आम्ही त्यांच्या घरण्यातील असलो तरी छत्रपती शिवराय कोणत्या एका घराण्यापुरते मर्यादित नव्हते. सर्वच जाती-धर्मांतील लोक हे माझं कुटुंब आहे, हा विचार या युगपुरुषांनी मांडला, तो आचरणात आणला. त्यामुळे समाधीस्थळाचा विकास साधणे ही आमच्या बरोबरच शासनाची देखील जबाबदारी आहे.आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहोत. सर्वत्र स्पर्धा सुरू झालीय. या स्पर्धेत पुढे जात असताना आपण आपला इतिहासही विसरता कामा नये. कारण साडेतीनशे वर्षांनंतरही शिवरायांचं नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला ऊर्जा मिळते. त्यामुळे नव्या पिढीला इतिहास समजावा, यासाठी इतिहासाचे जतनही व्हायला हवे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिज्ञासा संस्थेचे कार्याध्यक्ष नीलेश पंडित यांच्यासह संगममाहुली ग्रामस्थ उपस्थित होते.
अजित पवारांना साताऱ्यात उभं रहायचं असावं...साताऱ्याचा पुढचा खासदार व जावळीचा आमदार हा राष्ट्रवादीचा असेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी केले होते. याबाबत छेडले असता खा. उदयनराजे म्हणाले, ‘जो-तो पक्ष वाढीसाठी बोलत होतो. असल्या कोणत्याही आव्हानांना मी भीक घालत नाही. कोणती आव्हानं स्वीकारायची आणि कोणती नाही, हे माझं मी ठरवतो. सातारा लोकसभेची निवडणूक शरद पवार यांनी लढवावी, अशी इच्छा त्यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अजित पवारांचे साताऱ्यात दौरे वाढले आहेत. कदाचित त्यांना भविष्यात इथून उभं राहायचं असावं.
उद्योजकांनी ‘टाटा’ ग्रुपचा आदर्श घ्यावापवार कुटुंबीयांनी अदानी ग्रुपचे समर्थन केले आहे, असे विचारताच खा. उदयनराजे म्हणाले, ‘मला याबाबत काही माहिती नाही; परंतु मला एकच वाटते, देशातील सर्व उद्योजकांनी टाटा ग्रुपचा आदर्श घ्यायला हवा. या ग्रुपने रोजगार निर्मिती तर केलीच शिवाय शिक्षण, आरोग्य क्षेत्रांतही भरीव काम केले. 'टाटां'च्या या सामाजिक उपक्रमांचे अन्य उद्योजकांनी अनुकरणच करायला हवे.