Vidhan Sabha Election 2024: प्रीतिसंगमावर पहिल्यांदाच कमळ फुलले; कऱ्हाड दक्षिण, उत्तरमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 04:49 PM2024-11-24T16:49:36+5:302024-11-24T16:50:54+5:30
सातारा: राज्याचे आणि सातारा जिल्ह्याचे राजकारण ज्यांच्या विचारावर उभे राहिले आणि वाढले त्या यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत आणि कऱ्हाड ...
सातारा: राज्याचे आणि सातारा जिल्ह्याचे राजकारण ज्यांच्या विचारावर उभे राहिले आणि वाढले त्या यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत आणि कऱ्हाड दक्षिण व उत्तर मतदारसंघात प्रथमच काँग्रेसचा पराभव झाला आहे. याठिकाणी असलेल्या या दोन्ही मतदारसंघांच्या प्रीतिसंगमावर भाजपचे कमळ फुलले आहे. यशवंत विचार पुढे घेऊन जाणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा याठिकाणी पराभव झाला.
सातारा जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीत मोठे फेरबदल झाले आहेत. यातील कऱ्हाड उत्तर या मतदारसंघाचे नेतृत्व हे सुरुवातीला यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील आणि बाळासाहेब पाटील यांनी केले होते. बाळासाहेब पाटील यांनी राज्याचे सहकारमंत्री म्हणून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले आहे.
पी. डी. पाटील आणि बाळासाहेब पाटील हे दोघेही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने चालणारे होते. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासारखा चांगला कारखाना त्यांनी सचोटीने चालवला. त्यामुळे या भागातील ते मतदार राखून होते. पण, भाजपच्या मनोज घोरपडे या उमेदवाराने मतदारसंघाची चांगली बांधणी करत त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांची मिळालेली साथ विचारात घेता बाळासाहेब पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ तर स्वत: यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ. या मतदारसंघाचे नेतृत्व यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. या सर्वच दिग्गजांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून महत्त्वाची खाती सांभाळली होती. त्यामुळे पहिल्यापासून या मतदारसंघात कोणालाच शिरकाव करता आला नव्हता. राज्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच या मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आला आहे.
अखेर अतुल भोसले यांनी विजयश्री खेचून आणली
कऱ्हाड दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघात अतुल भोसले यांचा संपर्क होता. यापूर्वी त्यांनी कऱ्हाड उत्तरमधूनही निवडणूक लढविली होती. त्यानंतर मागील तीन निवडणुका त्यांनी कऱ्हाड दक्षिणमधून लढल्या. प्रत्येक वेळी त्यांनी जोरदार लढत दिली. मात्र, दिग्गजांसमोर त्यांचा टिकाव लागत नव्हता. अखेर यावेळी त्यांनी जोरदार तयारी करत विजयश्री खेचून आणली.