सातारा : भाजपाने माण, सातारा, कऱ्हाड दक्षिण तर शिंदेसेनेकडून पाटण आणि कोरेगावचे उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीची उत्सुकता लागली होती. अखेर वाई मतदारसंघातूनच राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तथापि, कऱ्हाड उत्तर आणि फलटणला अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. एकीकडे भाजपातून चार-जण शड्डू ठोकून तयार आहेत तर दुसरीकडे जागेवर दावा तर केलाय पण उमेदवारी कोणाला द्यायची, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे.महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेने पहिली यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ३८ उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर झाली. सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे मकरंद पाटील यांचा यादीत समावेश आहे. तथापि, फलटणमधून संपूर्ण राजेगट बाहेर पडल्यानंतर उमेदवारच राहिला नाही. त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार तयारीत आहे.कराड उत्तर विधानसभा मतदारसंघावरही राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. या ठिकाणी भाजपातून धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ आणि कुलदीप क्षीरसागर आदींनी विधानसभेसाठी जय्यत तयारी केली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही उमेदवारीसाठी कोणताही चेहरा समोर केलेला नाही. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पत्ता ओपन करणार की भाजपातीलच शिलेदाराच्या हातावर घड्याळ बांधून जागा आपल्याकडेच खेचणार याची उत्सुकता लागली आहे.
महाविकास आघाडीचा उमेदवार कोणआमदार मकरंद पाटील यांनी २००९ पासून वाईचा गड मजबूत राखला असून चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मकरंद पाटील अजित पवार गटात गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात मोठी पोकळी निर्माण झाली. यामुळे येथे स्वपक्षातील इच्छुकांबरोबरच मित्रपक्ष आणि विरोधी पक्षातील उमेदवारांचीही चाचपणी सुरू आहे. मकरंद पाटील यांना आव्हान देऊ शकतील, असे मदन भोसले सध्या भाजपातच आहेत. त्यांची उमेदवारी कापली गेली आहे. तुतारी खांद्यावर घेणार का भाजपातच राहणे पसंत करणार, याची वाईत उत्सुकता आहे.