सातारा : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत महायुतीला आघाडी मिळाली होती; पण आताच्या विधानसभा निवडणुकीत सर्वत्रच ‘कांटे की टक्कर’ होत आहे. त्यातच दोन मतदारसंघांत अपक्षांनीही जोर लावला आहे. यामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीलाही विजयाचे गणित मांडणे अवघड झालेले आहे.सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण १०९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील तब्बल ५७ जणांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. तरीही आठ मतदारसंघांत महाविकास आघाडी आणि महायुतीतच खरा सामना आहे; पण पाटण आणि वाईत आघाडी आणि युतीत बंडखोरी झाल्याने दोन्ही अपक्षांनी गणिते बिघडवलीत. त्याचा फायदा आणि तोटा कोणाला, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यातच मतदानाची तारीख जवळ आली असताना राजकीय घडामोडीही घडू लागल्या आहेत. त्यामुळे लोकसभेतील मतदानावर विजय-पराजयाचे गणित मांडणे अवघड आहे.सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात साताऱ्यातील माण आणि फलटण हे दोन विधानसभेचे मतदारसंघ येतात. माढ्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मताधिक्याने विजय मिळवला; पण त्यांना माण, फलटणमध्ये भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यापेक्षा कमी मते मिळाली. आता या दोनही मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांसाठी कांटे की टक्कर आहे. सरळसरळ युती आणि आघाडीच्या उमेदवारातच सामना आहे. त्यामुळे झुकते माप कोणाकडे सांगणे अवघड आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे गणित येथे जुळवणे कठीण झाले आहे. सातारा लोकसभा अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत कोरेगाव, कऱ्हाड दक्षिण आणि सातारा विधानसभा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना आघाडी होती. तर वाई, कऱ्हाड उत्तर आणि पाटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना मताधिक्य होते. यातील पाटण आणि वाईत युतीचे आमदार असतानाही आघाडीचे शशिकांत शिंदे हे आघाडीवर राहिले. तर कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही तेथे भाजपच्या उदयनराजेंना अधिक मते मिळाली. लोकसभेतील हे गणित आताच्या विधानसभा निवडणुकीत मांडणेही फसवे ठरणार आहे. कारण, पाटण, कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर आणि कोरेगाव, वाई मतदारसंघांत जोरदार चुरस आहे.
Vidhan Sabha Election 2024: सातारा जिल्ह्यात ‘कांटे की टक्कर’; लोकसभेच्या मतदानावर विजयाचे गणित अवघड
By नितीन काळेल | Published: November 16, 2024 7:19 PM