नितीन काळेलसातारा : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ आल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून काही मतदारसंघात संघर्षाची स्थिती आहे. त्यातच जिल्ह्यातील आठ मतदारसंघात नऊ आमदार उतरले आहेत. यामधील कोणाची विकेट पडणार याकडेही लक्ष लागलेले आहे. यातील दोन आमदार तर कोरेगावात समोरासमोर असून प्रतिष्ठेची लढाई सुरू झालेली आहे.जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या सर्वच मतदारसंघात एकूण १०९ उमेदवार रिंगणात उतरलेत. पण, खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीतच होत आहे. तरीही पाटण आणि वाई विधानसभा मतदारसंघात बंडखोरांनी रंगत आणली आहे. त्यामुळे संबंधित राजकीय गणिते बदलून कोणाचा फायदा करणार का, स्वत:च बाजी मारणार पाहणे महत्त्वाचे ठरलेले आहे.जिल्ह्यात आठही मतदारसंघात विद्यमान आठ आमदार लढा देत आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन आमदारांत काटे की टक्कर होत आहे. मागील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा शिवसेनेकडून मैदानात उतरलेल्या महेश शिंदे यांनी पराभव केला. आता दोघेही पुन्हा समोरासमोर आलेत. शिंदेसेनेकडून आमदार महेश शिंदे रिंगणात आहेत. तर विरोधातील शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत.माणमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे आहेत. घार्गेंच्या पाठीशी अनेक नेत्यांची ताकद उभी आहे. आमदार गोरे हे विकासकामे आणि पाणी प्रश्नांवर मतदारासमोर जात असले तरी त्यांच्यासाठीही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
सर्वच विद्यमान आमदारांपुढे यंदा आव्हान..कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसने माजी मुख्यमंत्री ही पृथ्वीराज चव्हाण यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. याठिकाणी भाजपचे अतुल भोसले यांचे आव्हान आहे.पाटण मतदारसंघात शिंदेसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई हॅटट्रिकच्या तयारीत आहेत. येथे दोन सेना समोरासमोर आहेत. उद्धवसेनेकडून हर्षद कदम आहेत. तरीही महाविकास आघाडीतील बंडखोर सत्यजितसिंह पाटणकर यांनी पालकमंत्र्यांपुढे आव्हान उभे केले आहे. सातारा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उभे आहेत. विरोधात उद्धवसेनेने अमित कदम यांना उतरवले आहे. कदम यांना आघाडीची किती ताकद मिळणार यावर लढत अवलंबून आहे.वाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील पुन्हा मैदानात आहेत. विरोधात शरद पवार गटातून अरुणादेवी पिसाळ रिंगणात आहेत. मात्र, शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी ताकद लावली आहे. त्यामुळे तिरंगी लढत आहे. फलटणमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार दीपक चव्हाण चौकार ठोकण्याच्या पवित्र्यात आहेत. विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सचिन कांबळे-पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. पण, या मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच कस लागणार आहे. दोघेही दोन उमेदवारांच्या पाठीशी आहेत. दोघांसाठीही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. विरोधातील भाजपच्या मनोज घोरपडे यांनी मोठे आव्हान उभे केलेले आहे. त्यातच आमदार पाटील यांच्याविरोधातील नाराजांची घोरपडे यांना रसद मिळू लागली आहे. यावरून सर्वच मतदारसंघात विद्यमान आमदारांना विरोधकांचे आव्हान आहे.