Maharashtra Budget 2024: सातारच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी, कऱ्हाडला युवक कौशल्य प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 11:54 AM2024-06-29T11:54:09+5:302024-06-29T11:55:25+5:30
सातारा : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अजित पवार ...
सातारा : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि ४३० खाटांचे रुग्णालय, कराड येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये युवक कौशल्य प्रकल्प, पश्चिम घाटाच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी रुपयांचा एकात्मिक विकास आराखडा असे महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याने याकडे सातारा जिल्ह्यासाठी कोणती तरतूद करण्यात येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. यानुसार राज्यात सध्या या १ लाख लोकसंख्येमागे ८४ डॉक्टर आहेत. २०३५ पर्यंत ही संख्या १०० च्या वर नेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी १०० प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यात ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात साताराचाही समावेश करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ३८१.५६ कोटी रुपये एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत श्रीक्षेत्र महाबळेश्वर विकास, प्रतापगड किल्ला जतन व सवंर्धन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन, कोयना व हेळवाक वनक्षेत्र अंतर्गत जलपर्यटनाचा समावेश आहे.
ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पानंतर ५०० औद्योगिक संस्थांची दर्जा वाढ, मॉडेल, आयटीआय, जागतिक कौशल्यकेंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे नागपूरसह सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स मान्यता देण्यात आली.
स्थानिकांना रोजगाराची संधी
सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यानुसार श्रीक्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकास व कोयना हेळवाक वन विभागांतर्गत कोयना नदी जलपर्यटन विकासाची कामे करण्यात येणार आहेत. मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात येणार असून नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्ट्स असणारा हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.