साताराः माझ्यासाठी सातारा एक प्रकारची गुरूभूमीसुद्धा आहे. मी ज्या संस्कारात वाढलो, ज्यांच्याकडून मी शिक्षा आणि दीक्षा घेतलेली आहे, ते साताऱ्याचे आहेत. साताऱ्यातील खटाव गावाचे लक्ष्मणराव इमानदार ज्यांना आम्ही गुजरातमध्ये वकीलसाहेब बोलायचो. त्यांचं जन्मस्थळ हे आहे, त्यांचीही शिक्षा आणि दीक्षा इथेच झाली होती. त्यानंतर ते गुजरातमध्ये आले आणि त्यांनी माझ्यासारख्याला शिष्याला शिक्षा आणि दीक्षा दिली. त्यामुळेच माझ्यासाठी ही गुरुभूमीसुद्धा आहे. माझ्यासाठी सातारा तीर्थयात्रेसारखंच आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत, ते साताऱ्यातील सभेत बोलत होते. जेव्हा उदयनराजे बोलत होते, तेव्हा माझं मन करत होतं ऐकतंच राहू, ऐकतंच राहू, एक एक शब्द हृदयातून निघत होता. सातारा संतांची भूमी आहे. समाज आणि देशाला दिशा देणाऱ्या नेतृत्वाची भूमी आहे. वीर संभाजी, वीर शाहुजी, समर्थ रामदास स्वामी, रामशास्त्री प्रभुणे, श्रीमंत प्रताप सिंह, सावित्रीबाई फुले, क्रांतिसिंह नाना पाटील, अशी अतुलनीय व्यक्तिमत्त्वं याच मातीत जन्माला आली आहेत, असंही मोदींनी सांगितलं आहे.यशवंतराव चव्हाणांसारखा दूरदृष्टीचा नेताही साताऱ्यानं देशाला दिला. सह्याद्री पर्वताच्या मागून जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा वाटतं हातात केसरी ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आले आहेत. हीच ती पवित्र भूमी आहे, जिथे शिवाजी महाराज आई भवानीचं दर्शन करायचे. पहिल्यांदा आमच्याकडे शिवाजी महाराजांचे संस्कार होते, आता त्यांचा पूर्ण परिवारच आमच्यासोबत आहे, याचा उल्लेखही मोदींनी केला आहे.
गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या सरकारनं शिवाजी महाराजांच्या संस्कारांनी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रसंरक्षण आणि राष्ट्रवादाला आम्ही प्राथमिकता दिली आहे. भारत भूमीवर वाईट नजर ठेवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल. शिवाजी महाराजांनी त्या काळातही सशक्त नव्या सेनेचं निर्माण केलं होतं. गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारनं भारतीय सेनेला जगातील ताकदवान सेनेच्या पंक्तीत आणून बसवलं आहे. भारताकडे अनेक अस्त्र आणि शस्त्रे आहेत. महायुतीच्या सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जे आमच्या विरोधात उभे आहेत, त्यांनी राष्ट्ररक्षेसाठी आम्ही उचललेल्या पावलांचा विरोध केला, असं म्हणत मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही टीकास्त्र सोडलं आहे.