साताराः काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट आहे. जे लोक साताऱ्याला बालेकिल्ला समजत होते, ते लोकही लढायची आता हिंमत करत नाही. राष्ट्रवादीनं पृथ्वीराज चव्हाणांना उतरवण्याचा प्रयत्न केला, पण तेसुद्धा लढायला तयार नाहीत. शरद पवार हे शरद पवार आहेत, ते हवेची दिशा बरोबर ओळखतात, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत, ते साताऱ्यातील सभेत बोलत होते. पुढे ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शहिदांवर जेव्हा प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा सर्वात जास्त दुःख साताऱ्यातील भूमीला होतं. सावरकरांना हे लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा साताऱ्याचा राग अनावर होतो. काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे, तर शिवसेना-भाजपा महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. साताऱ्यात महामार्गाचे अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. नाही तर पहिल्यांदा विकासाच्या नावावर कशा पद्धतीचं राजकारण व्हायचं हे तुम्हाला माहीतच असेल. 90च्या दशकात महायुतीचं सरकार होतं, तेव्हा काही धरणांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यानंतर महायुतीचं सरकार गेलं आणि त्या फायली अडगळीत गेल्या. परंतु आमच्या सरकारनं पुन्हा त्या फायली खोलल्या आणि साताऱ्याचा विकास केला. शेतकऱ्यांचा विचार महायुतीच्या सरकारनंच केला आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या सरकारनं शिवाजी महाराजांच्या संस्कारांनी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रसंरक्षण आणि राष्ट्रवादाला आम्ही प्राथमिकता दिली आहे. भारत भूमीवर वाईट नजर ठेवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल. शिवाजी महाराजांनी त्या काळातही सशक्त नव्या सेनेचं निर्माण केलं होतं. गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारनं भारतीय सेनेला जगातील ताकदवान सेनेच्या पंक्तीत आणून बसवलं आहे. भारताकडे अनेक अस्त्र आणि शस्त्रे आहेत. महायुतीच्या सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जे आमच्या विरोधात उभे आहेत, त्यांनी राष्ट्ररक्षेसाठी आम्ही उचललेल्या पावलांचा विरोध केला, असं म्हणत मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही टीकास्त्र सोडलं आहे.