सातारा - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासोबत साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीचाही प्रचार रंगात आला आहे. विरोधकांकडून भाजपावर आरोप लावला जात आहे की, महाराष्ट्राची निवडणूक असताना कलम ३७० चा प्रचार करुन राज्यातील मुद्दे दुर्लक्षित केले जात आहे. यावरुन भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर प्रहार केला आहे.
यावेळी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, देशाचं रक्षण करणारे जवान शहीद होतात. महाराष्ट्राशी संबंध काय विचारता त्यांना लाज वाटायला हवे. शहीदांच्या कुटुंबीयांना जाऊन भेटा, काय वाताहत असे ते समजेल. हे चुकीचं आहे. जे कलम ३७० वर प्रश्न विचारताय त्यांनी देशात राहू नये अशाप्रकारे उदयनराजेंनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे.
तसेच माझा पक्ष हा जनता आणि समाज आहे, समाजाच्या हिताविरोधात काम करत असेल नेहमी विरोध असतो, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचा भंग झाला. अनेक प्रकल्प रखडलेले होते त्याला चालना भाजपा सरकारने दिले. मी पक्ष सोडला नाही समाज हा माझा पक्ष आहे. पक्ष सोडण्यासाठी खूप विचार केला. कलम ३७० सारखा निर्णय मोदींनी घेतला असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाणांनी काही काम केली नाहीत. यांना २-२ लाथा मारुन बाहेर काढणार आहेत. यांच्या वडिलांपासून सगळी पदे यांच्या घरात होती. यांनी जनतेसाठी काहीच काम केली नाही. सातारा सोडून ज्या शहरात ते राहतात त्या कराडातही विकास केला नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी विकास का केला नाही हा मोठा प्रश्न आहे. विरोधकांना स्वत:च्या घरच्यांचीही मते मिळणार नाही. हिंमत होती तर पृथ्वीराज चव्हाणांनी लढायचं होतं ना, पृथ्वीराज चव्हाण यांना हरणार याची जाणीव होती असा टोला उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाणांना लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपाकडून निवडणूक लढविणारे छत्रपती उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत 2 लाख मतांनी पराभूत होणार असा दावा केला होता. तसेच मोदी-शहा कोणीही आले तरी उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला होता.