कराड - विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडणार आहे. भाजपाकडून निवडणूक लढविणारे छत्रपती उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत 2 लाख मतांनी पराभूत होणार असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदी-शहा कोणीही आले तरी उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला आहे.
कराडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी आले होते. अमित शहा म्हणजे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडात येणार होते पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठविला असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी अमित शहांना लगावला आहे. कराड दक्षिण या मतदारसंघातून भाजपाकडून अतुल भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवित आहेत.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना आघाडीकडून उभे करण्यात येणार होते. मात्र पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.
कोण आहेत श्रीनिवास पाटील?श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे महाविद्यालयीन काळातील जिवलग मित्र आहेत. या दोघांचे शिक्षण पुण्यात झाले. श्रीनिवास पाटील पुढे सनदी अधिकारी झाले. पवारांच्या आग्रहाखातर जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या पाटील यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला. १९९९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कराड मतदारसंघातून पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. तसेच २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही पाटील सलग दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेले होते. नंतरच्या पाच वर्षांच्या काळात श्रीनिवास पाटील यांना सिक्कीम राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आता वयाच्या ७९ व्या वर्षी ते लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा भेदण्यासाठी भाजपाने दोन राजेंना आपल्या गोटात सामील करुन घेतलं आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा पोटनिवडणुकीत बाजी कोण मारणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.