महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होत आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम ठोकून खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे आणि त्यात भाजपाने उदयनराजेंनाच रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्या आणि सातारा जिल्ह्यातील भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी टीकाकारांना आपल्या शैलीत उत्तर दिलं. अवघ्या चार महिन्यांत खासदारकी सोडणं, हा साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, अनेकांना तो पटलेला नाही. हे ओळखूनच उदयनराजेंनी आज आपली या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली.
काही जण निवडणुका जवळ आल्या की पक्ष सोडतात. कुणाचं सरकार येणार हे पाहून त्या पक्षात जातात. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने चांगले निर्णय घेतले. ज्यांच्या आशीर्वादाने मी जिंकलो त्या मतदारांनाही या सरकारचं काम पटलं. मोदींसोबत गेला नाहीत, तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही, असंही काहींनी सांगितलं. त्यानंतर, माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी राष्ट्रवादी सोडली आणि खासदारकीचाही राजीनामा दिला, असं स्पष्ट करत उदयनराजेंनी मतांचा जोगवा मागितला.
कलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्यांनी देशात राहू नये; उदयनराजेंची राजे'शाही'
नरेंद्र मोदी 'आयर्न मॅन', उदनयराजेंकडून मोदींना सरदार पटेलांची उपमा
कलम ३७० चा मुद्दा महाराष्ट्रात कशाला?, असा प्रश्न करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी चपराक लगावली. महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशातील सर्व राज्यांसाठी हा मोठा निर्णय आहे. काँग्रेसचे सरकार असताना हा निर्णय घेतला गेला असता तर कित्येक सैनिकांचे प्राण वाचले असते, त्यांची कुटुंब सुखात असती, असं त्यांनी सुनावलं.
गड-किल्ल्यांवर बार उघडायच्या विचारापेक्षा मेलेलं बरं- उदयनराजे
किल्ल्यावर छमछमची एवढी हौस असेल तर चौफुल्याला जा
मराठा समाजाला साद
स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणवणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक पाऊलही पुढे टाकलं नाही, पण राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठ्यांना न्याय दिला, असं आवर्जून नमूद करत उदयनराजेंनी मराठा मतदारांना साद घातली. काँग्रेसने फक्त राजकारण केलं, समाजकारण नाही. त्यांना सत्तेचा अहंकार होता, असा टोला त्यांनी हाणला.